Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ६ महिन्यांतील पाचवी घटना, एकाच सूत्रधाराचा संशय?

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाला शुक्रवारी (६ नोव्हेंबर) धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली असून न्यायालय परिसरातील सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्बशोधक व नाशक पथक (BDDS) तसेच पोलिसांच्या श्वानपथकाने संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी केली. प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली, तरी या ई-मेलमध्ये उच्च न्यायालयाव्यतिरिक्त महालक्ष्मी रेसकोर्स आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याचाही उल्लेख असल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या मुंबई उच्च न्यायालयाला दिवाळीची सुट्टी असली, तरी नियमित सुट्टीकालीन न्यायालयाचे कामकाज सुरू असल्याने न्यायालयात न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. धमकीचा ई-मेल धडकताच सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने शोधमोहीम हाती घेतली. बॉम्बशोधक आणि श्वानपथकाने इमारतीचा कानाकोपरा पिंजून काढला. कोणतीही स्फोटक सामग्री न मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालय परिसरातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.

हेही वाचा

अंडर-१९ आशिया चषकात भारताची विजयी सलामी! आर्यवीर सेहवागचे ५२ चेंडूंत वादळी अर्धशतक; नेपाळचा धुव्वा

तीन प्रमुख ठिकाणे रडारवर

धमकीच्या या ई-मेलमध्ये केवळ उच्च न्यायालयच नव्हे, तर महालक्ष्मी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्यालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित इतर दोन ठिकाणांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा ई-मेल नेमका कुठून पाठवला गेला, त्याचा आयपी (IP) अ‍ॅड्रेस काय आहे आणि त्यामागे कोणती व्यक्ती किंवा टोळी कार्यरत आहे, याचा छडा लावण्यासाठी सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

गेल्या सहा महिन्यांत ५ धमकीचे ई-मेल; एकाच सूत्रधाराचा संशय

गेल्या सहा महिन्यांत मुंबईत महत्त्वाच्या शासकीय आस्थापना आणि सेलिब्रिटींना लक्ष्य करून धमकीचे ई-मेल पाठवण्याची ही सलग पाचवी घटना आहे. यापूर्वी १० जून, ७ ऑगस्ट, २३ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी अशाच स्वरूपाचे धमकीचे संदेश पाठवण्यात आले होते. याआधी आलेल्या धमक्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालय (CMO), मुंबई महापालिका मुख्यालय (BMC), महापौर कार्यालय, मुंबई शेअर बाजार (BSE), शाळा, अभिनेता अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान तसेच गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टच्या ठिकाणाचा समावेश होता. या सर्व ई-मेल्सची भाषा आणि धमकी देण्याच्या पद्धतीमध्ये मोठे साम्य आढळून आले असून, यामागे एकाच विकृत व्यक्तीचा अथवा विशिष्ट सूत्रधाराचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group