TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल; २० हजार कोटींच्या प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

जायकाच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांना जोडणार; २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन, सुमारे एक कोटी नागरिकांना होणार लाभ

मुंबई : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून हा भाग दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तातडीने अपलोड करून तो केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाकडे पाठविण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या (JICA) वरिष्ठ शिष्टमंडळासोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या आराखड्यासह महाराष्ट्र आणि जपान यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जायकाकडून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील पाण्याचे असमान वितरण लक्षात घेऊन अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणांमधून दुष्काळी भागातील धरणांपर्यंत बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी दुहेरी प्रवाहाची व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांचा समावेश

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या टप्प्यात जायकवाडी, माजलगाव, मांजरा, उजनी, निम्न तेरणा आणि निम्न मनार ही धरणे परस्परांना जोडण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ३ हजार ९५ किलोमीटर लांबीच्या मुख्य आणि दुय्यम पाइपलाइन तसेच १५ जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा सुमारे एक कोटी नागरिकांना थेट लाभ होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा –  शरद पवारांची प्रकृती उत्तम; उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती

२० हजार कोटींच्या कर्जसहाय्याबाबत जायकाचा सकारात्मक प्रतिसाद

संपूर्ण आठ जिल्ह्यांतील वॉटर ग्रीड प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे २५ हजार ५६ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचे कर्जसहाय्य देण्याबाबत जायकाने सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

लातूर आणि धाराशिव हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने प्रकल्पाच्या बांधकामात जपानचे प्रगत भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यामध्ये डक्टाईल आयर्न पाइप्स, आधुनिक पंपिंग यंत्रणा आणि SCADA प्रणालीचा समावेश असेल. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटी, शेंद्रा-बिडकीन आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनाही शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

AVGC क्षेत्रातही जपानसोबत सहकार्य

अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रात महाराष्ट्राला जागतिक स्तरावर पुढे नेण्यासाठी जपानी कंपन्या आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फेब्रुवारीमध्ये मुंबईत ‘मांगा कारवान’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वागत केले.

२०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया जायकाच्या सहकार्याने तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. २०२९ पर्यंत प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासासाठी तसेच पाणी, वाहतूक, पर्यावरण आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्पांसाठी राज्य शासन जपानसोबतचे सहकार्य अधिक दृढ करणार आहे. या सर्व प्रकल्पांना शासनाकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू नाईक, ‘मित्रा’चे विभाग प्रमुख डॉ. संजय बेलसरे उपस्थित होते. तसेच भारतातील जपानच्या महावाणिज्यदूत हितोमी सातो, जपानचे वाणिज्यदूत केन्जी ताकागी आणि जायकाच्या भारत कार्यालयाचे मुख्य प्रतिनिधी ताकुरो ताकेउची यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group