शरद पवारांची प्रकृती उत्तम; उद्याच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, एकनाथ शिंदेंची माहिती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; राजकारणापलीकडेही पवारांशी कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील तपासण्यांसाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यापासून विविध राजकीय पक्षांतील नेते त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. डॉक्टरांशीदेखील माझी चर्चा झाली. पवारसाहेबांची प्रकृती आता उत्तम आहे. त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.”
‘ही राजकीय भेट नव्हती’
या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते रुग्णालयात असताना त्यांची भेट घेणे ही माणुसकीची भावना आहे. राजकारणापलीकडेही काही नाती असतात. शरद पवार आणि माझे संबंध केवळ राजकारणापुरते मर्यादित नाहीत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. काही प्रश्न किंवा अडचणी असतील, तर पवारसाहेब मला फोन करतात, असेही शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा – अजितदादांची इच्छा असती तर १२ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा
शरद पवारांनी दुष्काळाच्या परिस्थितीची केली विचारपूस
शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दुष्काळाच्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पवारसाहेब दुष्काळाच्या प्रश्नाबाबत अतिशय संवेदनशील आहेत. त्यांनी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत माझ्याकडे चौकशी केली. दुष्काळी भागाचा दौरा करत असतानाच त्यांना संसर्ग झाला होता. मात्र, आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राजकीय चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र, या भेटींचा आणि विलिनीकरणाच्या चर्चेचा थेट संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नाही.




