मनोज जरांगे पाटलांचा ऑडिओ क्लिपप्रकरणी मोठा खुलासा; मूळ डिव्हाइस रामदास कदम यांच्याकडे असल्याचा दावा
‘क्लिपचा स्रोत माझ्याकडून विचारण्याऐवजी रामदास कदम यांच्याकडे विचारा’; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. ही क्लिप नेमकी कोणी दिली आणि ती कशी समोर आली, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य करताना क्लिपच्या मूळ स्रोताबाबत महत्त्वाचा दावा केला आहे.
“व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगमधून मराठ्यांबद्दल किती द्वेष आहे, हे समोर आले. त्यांचा डाव हाणून पाडला. या ऑडिओ क्लिपचा स्रोत सांगता येणार नाही. माझ्याऐवजी रामदास कदम यांच्याकडून त्याचा स्रोत विचारावा. मूळ डिव्हाइस त्यांच्याकडेच असून त्यांना याबाबत माहिती आहे. माझ्याआधी दोन तास आधी त्यांनी ही क्लिप वाजवली होती,” असे जरांगे पाटील म्हणाले.
या प्रकरणाच्या तपासाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “गरिबांची माणसे असती, तर आधी अटक करून नंतर चौकशी केली असती. मात्र, या प्रकरणात आधी एसआयटी नेमण्यात आली आहे. अद्याप त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला नाही. मूळ डिव्हाइस रामदास कदम यांच्याकडे असल्याचा माझा दावा आहे. मग ते शोधण्याची गरज काय?” असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा – मुंबई शहर आणि उपनगरांत ९ नोव्हेंबरला स्थानिक शासकीय सुट्टी जाहीर
यावेळी जरांगे पाटील यांनी आपल्या विरोधात काही जणांकडून मोहीम राबवली जात असल्याचा आरोप केला. “माझ्या विरोधात बोलण्यासाठी ३० ते ३५ जणांची टोळी तयार केली आहे. त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे. हे एकनाथ शिंदे करत आहेत. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे करत होते, मात्र आता एकनाथ शिंदेही हे करत आहेत. मी एवढ्या दिवसांत अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. वर्ष-सहा महिने मोकळा राहिलो, तर सगळे मुळासकट बाहेर काढेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, आपल्या समर्थकांमध्ये विरोधकांची माणसे घुसवण्यात आल्याचा आरोप करत, “आता कोणालाही नाराज करणार नाही. पुढील तीन महिने कोणावरही बोलणार नाही,” असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, जरांगेंचे आवाहन
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. “१० ते २० वर्षांत पहिल्यांदाच दिवाळीसाठी घरी आलो आहे. पाण्याची परिस्थिती भीषण असून सर्वत्र फळबागाही जळून गेल्या आहेत. दिवाळीच्या खूप शुभेच्छा; मात्र यावेळी कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. सर्वांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. कोणीही हट्ट करू नये आणि साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या अडचणींचा उल्लेख करत त्यांनी कोणत्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले. “अशी संकटे आपण पिढ्यानपिढ्या पाहिली आहेत. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये,” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.




