मुंबई शहर आणि उपनगरांत ९ नोव्हेंबरला स्थानिक शासकीय सुट्टी जाहीर
दिवाळीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा निर्णय; मुंबईतील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सोमवारी राहणार बंद

मुंबई : दिवाळी सणाच्या अनुषंगाने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालये सोमवारी बंद राहणार आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून स्थानिक सुट्टी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीच्या अनुषंगाने तिसरी स्थानिक सुट्टी
शासनाच्या ९ डिसेंबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना गोपाळकाला (दहीहंडी) आणि अनंत चतुर्दशी या सणांनिमित्त स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर १० ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकानुसार, गोपाळकाला अर्थात दहीहंडीची ५ सप्टेंबर २०२६ रोजीची सुट्टी शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येत असल्याने ती २८ ऑगस्ट २०२६ रोजी देण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर २०२६ या वर्षासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना दिवाळी सणानिमित्त सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी तिसरी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा – अरुंधती रॉय यांच्या विधानाच्या निमित्ताने जातीय विषमता, हिंदू राष्ट्रवाद आणि समान नागरिकत्वाची चिकित्सा!
काय काय बंद राहणार?
या स्थानिक सुट्टीचे आदेश मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील. त्यामुळे या कार्यालयांचे कामकाज सोमवारी बंद राहणार आहे. मात्र, या आदेशात खासगी कार्यालये, बँका, शाळा किंवा इतर आस्थापनांचा समावेश असल्याचे नमूद नाही.
ही स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अँड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर १९५८ मधील तरतुदींनुसार जाहीर करण्यात आली असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.




