Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सोलापूरमध्ये बोगस डॉक्टरांवर आठ दिवसांत कारवाई! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रशासनाला निर्देश

शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करा; डॉक्टरांनी रुग्णसेवेत हलगर्जीपणा करू नये, आरोग्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय उपकरणे आणि साहित्याचा पूर्ण क्षमतेने वापर करून रुग्णांना उत्तम सेवा द्यावी. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या बैठकीला आमदार उत्तमराव जानकर, आमदार अभिजित पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य सेवा संचालक डॉ. कंदेवाड, उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, अभिराज सूर्यवंशी आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य उपकेंद्रांतील अधिकारी तसेच जन आरोग्य समित्यांचे लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

शासकीय रुग्णालयांवरील जनतेचा विश्वास वाढवा

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, जनतेच्या मनात शासकीय रुग्णालयांबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाकडून शासकीय रुग्णालयांना दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. डॉक्टरांनी या सुविधांचा रुग्णसेवेसाठी पुरेपूर वापर करावा.

महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करून गोरगरीब नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  बीडमध्ये दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन; पंकजा मुंडे यांनी घेतला आढावा

‘माझा गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानावर भर

‘माझा गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी जन आरोग्य समिती, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेने एकत्रितपणे काम करावे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

बैठकीत जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि तेथील अधिकारी व डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जन आरोग्य समित्यांच्या कामकाजाचाही आढावा घेऊन गरीब व गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी समित्या व आरोग्य यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरोधात येत्या आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा सामान्य आणि महिला रुग्णालयाला भेट

सोलापूर-सांगली आरोग्य संवाद यात्रेनिमित्त मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा महिला रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅब आणि अतिदक्षता विभागाची पाहणी करून तेथील उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला.

तसेच रुग्णालयातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळणारे उपचार, औषधे आणि आरोग्य सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली. उपचार घेताना येणाऱ्या अडचणी आणि रुग्णालयातील सेवांबाबत रुग्णांचे अनुभवही जाणून घेतले.

जिल्हा रुग्णालयातील आयुष्मान भारत डिजिटल मिशन कक्षालाही त्यांनी भेट दिली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधून उपचारांचा अनुभव जाणून घेतला. इतर रुग्णांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणींबाबतही माहिती घेतली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group