स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी शिक्षण विभागाचे नवे डिजिटल पोर्टल सुरू; १० शासकीय सेवा होणार ऑनलाइन
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ‘SFS Portal’चे ऑनलाइन उद्घाटन; अर्ज, कागदपत्रे अपलोड आणि अर्जाचा मागोवा घेण्याची सुविधा एकाच ठिकाणी

मुंबई : स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवीन ‘एसएफएस’ (Self Financed Schools) पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
या पोर्टलमुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि शैक्षणिक संस्थांना विविध शासकीय सेवांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाच्या प्रक्रियेचा मागोवा घेणेही शक्य होणार आहे. अर्ज प्रक्रिया डिजिटल झाल्यामुळे शासकीय कामकाज अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. हे पोर्टल विकसित करणाऱ्या पथकाचेही त्यांनी अभिनंदन केले.
एसएफएस पोर्टलवर १० शासकीय सेवा उपलब्ध
नवीन एसएफएस पोर्टलवर स्वयंअर्थसहाय्यित शाळा आणि संस्थांसाठी एकूण १० प्रकारच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मंडळ संलग्नतेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणे, ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण, दोन सत्रांमध्ये शाळा चालविण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शाळेचे स्थलांतर आणि शाळा व्यवस्थापनाचे हस्तांतरण या सेवांचा समावेश आहे.
याशिवाय इयत्ता अकरावीसाठी अतिरिक्त तुकडी किंवा अतिरिक्त शाखा सुरू करण्याची परवानगी, मंडळ बदलणे, शाळेचे नाव आणि माध्यम बदलण्याची परवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र संलग्नता रद्द करणे तसेच शाळेची प्रवेशक्षमता वाढविण्यासाठीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
हेही वाचा – बीडमध्ये दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन; पंकजा मुंडे यांनी घेतला आढावा
शिक्षण प्रक्रियेच्या डिजिटल सुविधांवर भर
पोर्टलमुळे शाळांना विविध परवानग्या आणि शासकीय सेवांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, कागदपत्रे सादर करण्यापासून अर्जाच्या स्थितीची माहिती मिळविण्यापर्यंतची प्रक्रिया डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांचा वेळ वाचण्यास आणि प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.
शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करून शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सर्व संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख ऑनलाइन उपस्थित होते.




