TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचा दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा; १० हजारांहून अधिक पोलिस तैनात

 निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक; रामलीला मैदानावर १० लाखांहून अधिक लोक जमण्याचा आयोजकांचा दावा, तर पोलिसांचा अंदाज ७० हजारांचा. महारॅळीच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीत वाहतुकीत मोठे बदल.

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. या मागण्यांसाठी इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा आयोजित केला आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही महारॅली होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रामलीला मैदानावर १० हजारांहून अधिक पोलिस तैनात

महारॅलीच्या सुरक्षेसाठी रामलीला मैदानावर १० हजारांपेक्षा अधिक पोलिस, सुरक्षा दलांचे जवान आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण मैदानाचे १४ विभाग करण्यात येणार असून प्रत्येक विभागावर पोलिसांची नजर राहणार आहे.

मैदान परिसरात २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय ड्रोन आणि पोलिसांच्या बॉडी कॅमेऱ्यांद्वारेही देखरेख केली जाणार आहे. सुरक्षेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी मैदानात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

या सभेला १० लाखांपेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील, असा दावा इंडिया आघाडीकडून करण्यात येत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे सुमारे ७० हजार लोक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

दिल्लीचे पोलिस आयुक्त अनुराग कुमार आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस आयुक्त देवेश चंद्र श्रीवास्तव यांनी शनिवारी दुपारी रामलीला मैदानाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मैदानातील तयारीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. संशयित व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले. गर्दीमध्ये गोंधळ किंवा सुरक्षेतील त्रुटी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर विशेष दक्षता घेण्यासही सांगण्यात आले.

दिल्लीतील वाहतुकीत मोठे बदल; १० मार्गांवर नियंत्रण

इंडिया आघाडीच्या महारॅलीमुळे दिल्लीतील वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. दिल्ली वाहतूक पोलिसांनी मध्य दिल्लीसाठी विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. गरज भासल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांनी खालील १० ठिकाणांवरील वाहतुकीत बदल केल्याचे सांगितले आहे :

  • नेताजी सुभाष मार्ग टी-पॉइंट
  • राजघाट
  • दिल्ली गेट
  • आयटीओ ए-पॉइंट
  • अजमेरी गेट रेड लाईट
  • बाराखंबा रोडवरील रणजित सिंग फ्लायओव्हर
  • भवभूती मार्ग-डीडीयू मार्ग रेड लाईट
  • झंडेवालन गोलचक्कर
  • तुर्कमान गेट
  • मिरदर्द चौक

याशिवाय बहादूर शाह जफर मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग, अरुणा असफ अली रोड, मिंटो रोड, डीबीजी रोड आणि बाराखंबा रोडवरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कमला मार्केट गोलचक्कर आणि हमदर्द चौक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ शकते.

त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button