TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची कुटुंबीयांशी भेट

राम पुर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेऊन तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. योग्य न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ठाणे : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. प्रदीप पुर्णेकर यांचे कुटुंबीय राम पुर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. निरंजन डावखरे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

या प्रकरणात योग्य न्याय मिळवून दिला जाईल आणि आरोपींना सरकारकडून पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णेकर कुटुंबीयांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत एसआयटी, खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या माध्यमातून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

कापूरबावडी पोलिस ठाण्यातील पुरवणी जबाबात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे असल्याचा दावा राम पुर्णेकर यांनी केला. या दोघांची चौकशी झाली असताना मुख्य आरोपी म्हणून त्यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केल्याची माहिती आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री पोलिसांना काय निर्देश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२९ सप्टेंबरला कार्यालयात झाली होती हत्या

प्रदीप पुर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुर्णेकर कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, राजेंद्र शिंदे यांची पोलिसांकडून सात वेळा मिळून सुमारे ५० तास चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींसमोर बसवूनही त्यांची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, या चौकशीच्या आधारे त्यांच्याविरोधात कोणती कारवाई करण्यात येणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुर्णेकर कुटुंबीयांना फोन करून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा –  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीचा दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा; १० हजारांहून अधिक पोलिस तैनात

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा

दरम्यान, प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मीनाक्षी शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर आणि पक्षपातळीवर त्यांच्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन त्यांच्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्वाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

ज्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, त्यामध्ये आपले नाव जोडून पक्ष आणि नेतृत्वावर दबाव निर्माण केला जात असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. पक्षासाठी आपण आजवर निष्ठेने काम केले असून पक्षाची किंवा नेतृत्वाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्ष नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगत त्यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. हा निर्णय नाराजीतून घेतलेला नसल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पक्षाकडून कारवाई नाही; स्वतःहून राजीनामा

मीनाक्षी शिंदे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. राजीनाम्यानंतर त्या ठाणे महापालिकेच्या नगरसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेच्या ‘लाडकी सून अभियान’चे पदही असल्याची माहिती आहे.

मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे हे मानपाडा विभागाचे विभागप्रमुख आहेत. पुर्णेकर कुटुंबीयांकडून या प्रकरणात दोघांच्या अटकेची मागणी केली जात असताना मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button