‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली विरोधकांचा फेक नॅरेटिव्ह; एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
१९७५ च्या आणीबाणीची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल; सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करणे हा संविधानाचा अपमान असल्याची टीका.

Eknath Shinde : ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’च्या नावाखाली काँग्रेस, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फेक नॅरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. १९७५ मधील आणीबाणीचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. ठाणे शहर भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनात ते बोलत होते.
आणीबाणीचा संदर्भ देत विरोधकांवर निशाणा
एकनाथ शिंदे म्हणाले की, १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू होती. त्यावेळी विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात होते आणि माध्यमांवर बंदी होती. मात्र, आज विरोधकांना आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते जंतरमंतरवर आंदोलन करतात, मोर्चे काढतात आणि पंतप्रधानांच्या घरासमोरही आंदोलन करतात. असे असतानाही देशात लोकशाही धोक्यात असल्याचा दावा केला जात असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
हेही वाचा – Ramayana Movie : यशच्या अभिनयाने मुलगा यथर्व भारावला; साई पल्लवीने सांगितला खास भावूक अनुभव
घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करण्यावरून काँग्रेसला सुनावले
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांवर संशय निर्माण करण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवरही शिंदे यांनी टीका केली. न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे आणि न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा अपमान असल्याचे ते म्हणाले.
‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ आंदोलनातून एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि विरोधी आघाड्यांच्या आंदोलनामागील हेतूवर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली.




