पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवरच २ तास आधी प्रश्नपत्रिका छापा; निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची महत्त्वाची सूचना
एमपीएससी पेपरफुटी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवरच दोन तास आधी प्रश्नपत्रिका छापण्याचा दिलीप भोसले यांचा प्रस्ताव.

MPSC Paper Leak : एमपीएससीच्या परीक्षांमधील अनियमितता, बदलणारे परीक्षा पॅटर्न आणि रखडलेली भरती प्रक्रिया यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आधीच चिंतेत आहेत. त्यातच पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना केली. पेपरफुटी रोखण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी ‘ABP माझा कट्टा’वर महत्त्वाची मते मांडली.
सोशल मीडियामुळे पेपरफुटीची प्रकरणे वेगाने समोर
पेपरफुटीच्या घटना प्रत्यक्षात वाढल्या आहेत की आता त्या अधिक वेगाने लोकांपर्यंत पोहोचत आहेत, या मुद्द्यावर बोलताना न्यायमूर्ती भोसले यांनी डिजिटल माध्यमांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. आज सोशल मीडिया अत्यंत सक्रिय असल्यामुळे कोणत्याही गैरव्यवहाराची बातमी काही क्षणांत सर्वत्र पोहोचते. तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता वाढली असून गैरप्रकार उघडकीस येण्याचा वेगही वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – ‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली विरोधकांचा फेक नॅरेटिव्ह; एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
परीक्षा केंद्रांवर दोन तास आधी प्रश्नपत्रिका छापण्याचा प्रस्ताव
पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे सांगत न्यायमूर्ती भोसले यांनी महत्त्वाचा पर्याय सुचवला. त्यांच्या मते, प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या दोन तास आधी प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यात यावी.
“आज आपण तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जगत आहोत. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षेच्या अवघ्या दोन तास आधीच प्रश्नपत्रिकांची छपाई व्हायला हवी,” असे मत त्यांनी व्यक्त केले. ऐनवेळी आणि थेट परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका छापल्यास वितरणाच्या मधल्या टप्प्यात होणारी पेपरफुटी रोखण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘पेपरफुटी हे विद्यार्थ्यांच्या करिअरसमोरील मोठे संकट’
पेपरफुटीचा सर्वाधिक फटका प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो, असेही न्यायमूर्ती भोसले यांनी अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या संपूर्ण करिअर आणि आयुष्यातील सर्वात मोठे कोणते संकट असेल, तर ते म्हणजे पेपरफुटी,” असे ते म्हणाले.
वर्षानुवर्षे मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी चौकशी आयोग कठोर आणि ठोस उपाययोजनांची शिफारस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पेपरफुटी रोखण्यासाठी आयोगाकडून कोणत्या शिफारशी केल्या जातात आणि परीक्षा प्रक्रियेत कोणते बदल होतात, याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.




