डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्रथम वर्ष डी. फार्मसी, बी. फार्मसी, एम. फार्मसी आणि डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म. डी.) अभ्यासक्रमांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स मुंबई चे उपाध्यक्ष व मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख श्री. संजय मोतिप्वार यांनी ‘फार्मा 4.0’ या संकल्पनेवर टाकला. औषधनिर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. औषधनिर्मिती, संशोधन व विकास, क्लिनिकल रिसर्च, फार्माकोव्हिजिलन्स, रेग्युलेटरी अफेअर्स आणि डिजिटल हेल्थ अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे आणि उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा एंजल ओक स्पेशालिटी केमटेक प्रा. लि., मुंबई येथील प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह डॉ. मोहिनी घोरपडे यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. फार्मसी विषयातील मूलभूत संकल्पना भक्कम करणे, आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणे, स्वतःची कौशल्ये विकसित करणे आणि व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक संबंध निर्माण करणे ही यशस्वी करिअरची महत्त्वाची सूत्रे असल्याचे त्यांनी सांगितले.
कॅम्पस प्लेसमेंट अधिष्ठाता श्रीमती जस्मिता कौर यांनी विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेच्या विकासासाठी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाते असे सांगितले. प्लेसमेंट मार्गदर्शनासोबतच सॉफ्ट स्किल्स, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संकुलाचे संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी विद्यार्थी व पालकांना संकुलाची माहिती देत महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. एकाच संकुलात विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने परस्पर संवादातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून शिकण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असेही त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षक आणि पालक या दोघांचीही भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संकुलातील समुपदेशक श्रीमती श्रुती शेठ यांनी मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या फार्माकोग्नोसी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक कल्याणी चांडे यांना त्यांच्या संशोधनातील व शैक्षणिक उल्लेखनीय कार्याबद्दल महाविद्यालयातर्फे ‘उत्कृष्ट प्राध्यापक’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान “शिशू व बाल आरोग्य सेवा” या विषयावरील तांत्रिक मासिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मासिकाचे संपादक डॉ. रमेश काटेदेशमुख, प्रा. अबोली मराळे आणि प्रा. काजल भगत विद्यार्थी समन्वयक मयूर कांबळे आणि आनंद कुमार उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रजत पदके तसेच निराली प्रकाशनची पुस्तके देऊन गौरविण्यात आले. यावेळी निराली प्रकाशन,पुणे चे संचालक जिग्नेशभाई फुरिया यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक डॉ. सारिका निकम, डॉ. प्रियतमा पवार, प्रा. काजल भगत, प्रा ऐश्वर्या पाटील आणि प्रा. धनश्री गरुड यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. पल्लवी चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थी प्रतिनिधी दीक्षा पांडे आणि माही पहाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. संकेत कदम यांनी आभार प्रदर्शन केले.




