TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्याला वाळू उत्खनन प्रकरणात मोठा दणका; ४.९० कोटींचा दंड पुन्हा कायम

तत्कालीन तहसीलदारांचा दंडातून वगळण्याचा आदेश रद्द; संजय कटारे यांच्याकडून रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याचे निर्देश

जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांना ४ कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांच्या दंडातून वगळण्याचा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. त्यामुळे २००० ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मूळ दंड पुन्हा कायम झाला असून, संबंधित रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी २१ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. या आदेशानुसार गट क्रमांक २६२ वरील ४ कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांचा बोजा पूर्ववत करण्यात आला आहे.

१८ जणांवर ठोठावला होता दंड

साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणी प्रशासनाने १८ व्यक्तींवर १६ एप्रिल २०२३ रोजी दंडात्मक कारवाई केली होती. या प्रकरणात २००० ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

मात्र, संजय कटारे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर तत्कालीन तहसीलदारांनी त्यांचे नाव दंडाच्या कारवाईतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात अजय महाराज बारस्कर यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती.

हेही वाचा –  ‘राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आहे का?’; ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ रामदास आठवले

चौकशीत तहसीलदारांच्या भूमिकेवरही निरीक्षणे

महसूल मंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. चौकशीदरम्यान तत्कालीन तहसीलदार तसेच संबंधित गौण खनिज शाखेतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही निरीक्षणे नोंदवण्यात आली.

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिलेल्या आदेशानुसार, संजय कटारे यांना दंडाच्या कारवाईतून वगळणारा तत्कालीन आदेश रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधित दंडाची रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची शक्यता

या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित गौण खनिज शाखेतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत चौकशीत नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे अंबड तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात आता संबंधित व्यक्तीकडून कोट्यवधींच्या दंडाची वसुली तसेच तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत पुढील प्रशासकीय कारवाईकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group