‘राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आहे का?’; ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ रामदास आठवले
CECच्या राजीनाम्याच्या मागणीवर आठवलेंचा टोला; ‘ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये’

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू व विवेक जोशी यांच्यातील कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून राजकीय वाद सुरू आहे. Indian Expressच्या अहवालानुसार, गेल्या दहा महिन्यांत संधू आणि जोशी यांनी मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे-पुन्हा समाविष्ट करणे आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावृत्तीशी (SIR) संबंधित निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त आहे.
या मागणीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत कॉक्रोच जनता पार्टीवर टीका केली. ‘राजीनामा मागण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी आहे का? त्यांनी आपले नाव बदलून राजीनामा जनता पार्टी करावे,’ असा टोला आठवले यांनी लगावला.
हेही वाचा – ‘एफडीएच्या अधिकाऱ्यांकडूनच वसुली?’; संजय राऊतांचे तुकाराम मुंढेंना पत्र
‘ज्ञानेश कुमार यांनी दबावाखाली राजीनामा देऊ नये’
रामदास आठवले यांनी ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करत त्यांनी कोणाच्याही दबावाखाली राजीनामा देऊ नये, अशी भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने SIRसह संबंधित निर्णय हे तिन्ही आयुक्तांच्या मान्यतेने आणि एकमताने घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तानंतर विरोधकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याचवेळी आयोगाने आपल्या स्पष्टीकरणात निर्णयप्रक्रिया सामूहिक आणि एकमताने झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
रामदास आठवले यांनी मात्र ज्ञानेश कुमार यांनी दबावाला बळी न पडता आपल्या पदावर कायम राहावे, अशी भूमिका व्यक्त केली आहे.





