Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नाशिक महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या ५० हजारांपुढे नेण्याचे लक्ष्य; मंत्री दादा भुसे

कुंभमेळ्यापूर्वी ‘शिक्षणाचा कुंभ’ उपक्रम राबविण्याचे आवाहन; राज्यात ३० हजार शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू

नाशिक : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्यात चांगले संस्कार, कला-क्रीडा कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणे आवश्यक आहे. शिक्षक, प्रशासन, लोकप्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजाच्या सहभागातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा गुणवत्तापूर्ण विकास साधता येतो. नाशिक महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या आगामी काळात ५० हजारांपुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने भोरे सभागृहात आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात भुसे बोलत होते. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित रंजन, सहआयुक्त स्मिता झगडे, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक संजय कळमकर, गटनेते अजय बोरस्ते, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पुरस्कारार्थी शिक्षकांचे कुटुंबीय उपस्थित होते.

गुणवत्तावाढीसोबत पालकांचा विश्वास मिळवा

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन सक्षम करणे हे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य आहे. महापालिका शाळांमधील गुणवत्तावाढीसोबतच पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे भुसे यांनी सांगितले.

कोल्हापूर, गडचिरोली, वाशिम तसेच पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमधील यशस्वी प्रयोगांची उदाहरणे देताना त्यांनी सांगितले की, शिक्षकाने निर्धार केला आणि त्याला लोकप्रतिनिधी व प्रशासनाची साथ मिळाली, तर शाळेचे चित्र बदलू शकते.

कुंभमेळ्यापूर्वी ‘शिक्षणाचा कुंभ’

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांमध्ये स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी, सुरक्षित इमारती, वाचनालय, ई-सुविधा, तिरंगा तसेच कला-क्रीडा सुविधांची उपलब्धता याकडे विशेष लक्ष द्यावे.

कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमध्ये ‘शिक्षणाचा कुंभ’ हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे. शिक्षणाचे महत्त्व घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवावा, असे आवाहन भुसे यांनी केले.

हेही वाचा –  तणावपूर्ण जीवनशैलीत योग संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता देतो; उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती

राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सुरू असून, पहिल्या टप्प्यात १३ हजार शिक्षकांची ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून विना-मुलाखत नियुक्ती करण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले. काही अनुदानित संस्थांनीही विना-मुलाखत शिक्षक नियुक्तीस सहमती दर्शविली आहे. अंतर्गत वाद असलेल्या संस्थांमध्ये शासनामार्फत थेट शिक्षक नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन शिक्षक उच्चशिक्षित असून, विद्यार्थ्यांना केवळ पाठांतराधारित शिक्षण न देता त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे शिक्षण देण्यावर भर असल्याचे भुसे म्हणाले. कला आणि क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक भरतीमध्ये कला-क्रीडा शिक्षकांनाही स्थान देण्यात आले आहे.

नाशिक महानगरपालिकेने ३६ शिक्षक पदांची मागणी केली असून, त्यापैकी ३१ पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही शिक्षकांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात सुधारली असल्याचे त्यांनी सांगितले.

हिवाळी शाळेतील प्रयोग प्रेरणादायी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथील जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण देताना शिक्षक केशव गावित यांच्या समर्पित कार्याचे भुसे यांनी कौतुक केले. मर्यादित सुविधांमध्येही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच त्यांच्या विविध गुणांना वाव देण्याचे काम या शाळेत होत आहे. शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करून गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम, सर्जनशील आणि जबाबदार भावी नागरिक घडवावेत, असे आवाहन भुसे यांनी केले.

महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठ्या पदांवर पोहोचले आहेत, ही अभिमानाची बाब आहे. शिक्षकांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याचा गौरव असून, त्यांचे मनोबल वाढविणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे, असे उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button