Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तणावपूर्ण जीवनशैलीत योग संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता देतो; उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

कैवल्यधामच्या गोर्धनदास सेक्सरिया कॉलेजचा अमृत महोत्सव उत्साहात; योगाची शास्त्रीयता आणि भारतीय तत्त्वज्ञान जपण्याचे आवाहन

पुणे : तंत्रज्ञान आणि वेगवान जीवनशैलीमुळे तणाव वाढत असताना योग व्यक्तीला संतुलन, जागरूकता आणि एकाग्रता प्रदान करतो. योगामुळे मन, शरीर आणि आत्म्यामध्ये संतुलन साधण्यास मदत होते. अधिक संतुलित, जागरूक आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योग हे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माजी केंद्रीय मंत्री तथा कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, राकेश सेक्सरिया आदी उपस्थित होते.

राधाकृष्णन म्हणाले की, आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग व्यक्तीला थांबण्याची, विचार करण्याची, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची आणि स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याची संधी देतो. मन आणि शरीरातील संतुलन तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी योग उपयुक्त आहे. माहितीच्या सततच्या प्रवाहाच्या काळातही महर्षी पतंजलींची सूत्रे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

योगाला जागतिक मान्यता

योगाला आज जागतिक स्तरावर व्यापक मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत योगाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्यात आला. विविध देश, संस्कृती आणि नागरिक योगाच्या माध्यमातून एकत्र येत असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची मोठी ताकद आहे. तरुणांच्या ऊर्जा, कौशल्य आणि आकांक्षांना शिस्त व जागरूकतेची जोड मिळाल्यास त्यांची क्षमता अधिक प्रभावीपणे विकसित होऊ शकते. या प्रक्रियेत योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  पुण्याचा सांस्कृतिक महोत्सव होणार राज्यातील नंबर वन; आशिष शेलारांची मोठी घोषणा

योगाच्या शास्त्रीय अभ्यासाची परंपरा

गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या योग शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करताना राधाकृष्णन यांनी स्वामी कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये योगाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी कैवल्यधामची स्थापना केल्याचे सांगितले. त्या काळात योगाच्या शास्त्रीय अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या समृद्ध वारशाचे जतन करून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आजच्या संस्थांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योगाची जागतिक स्तरावर वाढती लोकप्रियता लक्षात घेता, भारताने योगाचे मूलभूत ज्ञान, वैज्ञानिकता आणि त्याच्या मूळ तत्त्वज्ञानाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि सर्वांगीण आरोग्याला चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

कैवल्यधाम भारताचा अभिमान

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, कैवल्यधाम ही भारताचा अभिमान असलेली संस्था आहे. जवळपास शंभर वर्षांपूर्वी स्वामी कुवलयानंद यांनी वैज्ञानिक संशोधन, शिक्षण आणि आचरणाच्या माध्यमातून योगाचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. आज कैवल्यधामने योग आणि भारतीय संस्कृतीच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे.

गोर्धनदास सेक्सरिया कॉलेजचा अमृत महोत्सव हा केवळ एका संस्थेच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा उत्सव नसून, भारताच्या ज्ञानपरंपरेचे ७५ वर्षे जतन आणि प्रसारण केल्याचा उत्सव असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.

कैवल्यधामसारख्या संस्थांनी प्रशिक्षित योग शिक्षक, प्रशिक्षक आणि संशोधक घडवावेत. आधुनिक जगाशी प्रभावीपणे संवाद साधताना योगाची शुद्धता आणि अस्सलपणा जपण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या संस्थांवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी केंद्रीय मंत्री आणि कैवल्यधामचे चेअरमन सुरेश प्रभू म्हणाले की, कैवल्यधामने गेल्या शतकभरात योगाच्या क्षेत्रात संपादित केलेले ज्ञान, अनुभव आणि समृद्ध परंपरा केवळ संस्थेपुरती मर्यादित न ठेवता जगाच्या कल्याणासाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. कैवल्यधामचे ज्ञान जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी काळात व्यापक प्रयत्न करण्यात येतील.

कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राकेश सेक्सरिया यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वामी कुवलयानंद यांच्या पत्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि कैवल्यधाम परिवारातील सदस्य उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button