Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“आश्रमशाळांची अवस्था म्हशीच्या गोठ्यापेक्षाही वाईट”; अभिजीत दिपके संतापले

चंद्रपूर | आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याचा दावा सरकारी पातळीवर केला जात असताना, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र विदारक चित्र समोर आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या स्नानगृहांना छप्पर नाही, तर शौचालयांना दरवाजेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘स्कूल ठीक करो’ अभियानाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी गडचिरोलीतील आश्रमशाळांच्या पाहणीनंतर शिक्षण व्यवस्था आणि आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गडचिरोली दौरा पूर्ण करून चंद्रपुरात पोहोचलेल्या दिपके यांनी आश्रमशाळांमधील दुरवस्थेचा पाढा वाचला. भामरागड येथील स्व. बाबा आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील आश्रमशाळांचा अपवाद वगळता शासकीय आश्रमशाळांची अवस्था दयनीय असल्याचे त्यांनी सांगितले. “विद्यार्थिनींच्या स्नानगृहांना छप्पर आणि दरवाजे नाहीत, संडास-मूत्रघरांना कवाडे नसल्याने मुलींना अत्यंत लाजीरवाण्या परिस्थितीत उघड्यावर दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. काही ठिकाणची स्नानगृहे म्हशीच्या गोठ्यापेक्षाही वाईट अवस्थेत आहेत,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही अशी अवस्था असेल, तर स्थानिक पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

हेही वाचा

बायोमेट्रिक जुळत नाही? टेन्शन मिटलं! NCMC कार्डसाठी एसटी महामंडळाकडून ‘आधार OTP’चा पर्याय

काही शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक मद्यपान करून शाळेत येत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळले, असा दावाही दिपके यांनी केला. अशा मद्यपी मुख्याध्यापकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये उत्तम गुणवत्ता आहे; मात्र त्यांना सुरक्षित वातावरण आणि मूलभूत सुविधा पुरवण्यात शासन अपयशी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

चंद्रपूरच्या स्वयंसेवकांचे कौतुक

चंद्रपुरात आगमन झाल्यानंतर सीजेपी स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले. चंद्रपूर जिल्ह्यात स्वयंसेवकांनी आतापर्यंत ५५ शाळांची पाहणी करून प्रशासकीय पाठपुराव्याद्वारे अनेक शाळांची दुरुस्ती करून घेतली, याबद्दल त्यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले. मर्यादित साधनांमध्ये आमटे कुटुंबीयांनी उभा केलेला प्रकल्प सरकारसमोर आरसा धरतो, अशी बोचरी टिप्पणी करत दिपके पुढील दौऱ्यासाठी अमरावतीकडे रवाना झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button