TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सरकारची सकारात्मक भूमिका; “संवादातून प्रश्न सोडवू”, उदय सामंत यांची जरांगे पाटलांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती

“मराठा समाजासाठी सरकारने ५०० किमी पुढे पाऊल टाकले”; २१,०५१ जात प्रमाणपत्रांची पडताळणी, १६,११० प्रमाणपत्रांचे वाटप

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मकपणे काम करत असून, संवादातून प्रश्न सोडवण्याची भूमिका असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच सण-उत्सवांचा काळ लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासन आणि आरक्षण समितीची बैठक घेण्यात आली. मराठवाड्यात आतापर्यंत २१ हजार ५१ जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, त्यापैकी १६ हजार ११० प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. त्यामुळे प्रमाणपत्रांची पडताळणी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा गैरसमज दूर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या केवळ सुमारे २ हजार दाखले प्रलंबित असून, तेही लवकरच देण्यात येतील. या प्रक्रियेमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  रेशन कार्डधारकांना दिलासा! १ ऑक्टोबरपासून सर्व कार्ड बंद होणार नाहीत; e-KYC पूर्ण केल्यास लाभ कायम

“आंदोलनाला स्थगिती द्यावी”

मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधणे गरजेचे असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, सरकार संयमाने काम करत आहे. सध्या पोळा आणि गणेशोत्सवासारखे सण-उत्सव आहेत. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थितीही आहे. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

“जरांगे पाटील आक्रमक आहेत, तर आम्ही सरकार आहोत. आम्ही संयमानेच बोलावे लागेल,” असे सामंत यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अभ्यासकांशी चर्चा करण्यासाठी सरकारने आवाहन केले होते, असेही त्यांनी नमूद केले.

“सरकार ५०० किमी पुढे आले आहे”

मराठा समाजाच्या प्रश्नावर सरकारने चार पावले नव्हे, तर ५०० किमी पुढे पाऊल टाकले आहे, असा दावा उदय सामंत यांनी केला. दंगल घडवणे किंवा परिस्थिती बिघडवणे हा सरकारचा उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची सरकारला काळजी असून, आंदोलकांनीही त्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन सामंत यांनी केले. तसेच जरांगे यांचे समर्थक जसे आहेत, तसेच सरकारमधील नेत्यांचेही समर्थक आहेत. त्यांच्या भावना व्यक्त होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा प्रश्न संवादातून आणि कायदेशीर चौकटीत सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संयमाची भूमिका कायम ठेवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button