Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमहाराष्ट्रराजकारण

संत रविदास महाराजांच्या विचारांचा घराघरांत प्रसार; नोव्हेंबरपासून राज्यव्यापी अभियान

‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; १ लाख ८ हजार शाळा, ५,८४१ महाविद्यालये आणि ६५० गावांचा सहभाग

मुंबई : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. संत रविदास महाराजांचे मानवता, समता, करुणा, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अभियानाची व्यापक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित अभियानाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र चव्हाण, राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक रविंद्र राठोड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत रविदास महाराजांचे विचार केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले पाहिजेत. विविध सामाजिक परंपरांतील साम्यस्थळे आणि संतविचारांमधील एकात्मतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवून सामाजिक सलोखा व बंधुभाव दृढ करण्यासाठी या अभियानाचा उपयोग व्हावा. संबंधित विभागांनी समन्वयाने स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा उभारून नियोजित कार्यक्रम वेळेत पूर्ण करावेत. अभियानाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सातत्याने आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांचा सहभाग

या अभियानात राज्यातील १ लाख ८ हजार १३९ शाळा, ५ हजार ८४१ महाविद्यालये, ६५ विद्यापीठे आणि ११ हजार १५० सार्वजनिक ग्रंथालयांना जोडण्याचे नियोजन आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संतसाहित्य वाचन, संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सामाजिक सेवा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.

धार्मिक स्थळे, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि कामगार संघटना, महिला बचतगट, युवक मंडळे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, महामंडळे आणि आरोग्य संस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. राज्यापासून ग्रामस्तरापर्यंत विविध समित्यांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी होईल.

हेही वाचा –  शासकीय रुग्णालयांतील औषधांच्या गुणवत्तेवर आता आधुनिक यंत्राची नजर!

आरोग्य शिबिरे, श्रमवीर सन्मान आणि वृक्षारोपण

अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, नेत्र व दंत तपासणी, महिला व बाल आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे. श्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘श्रमवीर सन्मान’, कारागिरांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, महिला आर्थिक स्वावलंबन आणि युवा सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येईल.

राज्यातील ६५० गावांमध्ये विचारसभा आणि वृक्षारोपणाचे नियोजन आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन प्रचार वाहनांच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार केला जाणार आहे. चित्रफिती, पॉडकास्ट, मुलाखती आणि संवादात्मक कार्यक्रमांद्वारेही अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

‘डिजिटल रविदास ६५०’ उपक्रम

अभियानाच्या प्रचारासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर केला जाणार आहे. ‘डिजिटल रविदास ६५०’, ई-ग्रंथालय, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि ६५० प्रेरणादायी व्हिडिओ कथांचे उपक्रम राबविण्यात येतील. संत रविदास महाराजांचे साहित्य संकलित करून ते महाराष्ट्रातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीनेही नियोजन केले जाणार आहे.

नाशिकमध्ये १३ व १४ फेब्रुवारीला मुख्य कार्यक्रम प्रस्तावित

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम १३ व १४ फेब्रुवारी २०२७ रोजी नाशिक येथे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमात बेगमपुरा संकल्पना, संत संगम, सांस्कृतिक कार्यक्रम, समता महामंच, संत रविदास वारसा प्रदर्शन, संवाद केंद्र आणि सामुदायिक अन्नसेवा यांचा समावेश असेल. त्यानंतर ‘समाजकुंभ’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक परंपरांना एकत्र आणून समता, बंधुता, सामाजिक एकात्मता आणि मानवतेचा संदेश प्रसारित करण्याचे नियोजन आहे.

समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकाच व्यासपीठावर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची सूचना मांडली. विविध विभागांतील सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रितपणे सन्मानित केल्याने सामाजिक क्षेत्रातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना सुरू करण्याची सूचना केली. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, नव्या क्षेत्रांत काम करणाऱ्या युवकांना आर्थिक सहाय्य आणि युवकांच्या नवकल्पना व उद्योजकीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र निधी किंवा विश्वस्त संस्था स्थापन करण्याबाबत त्यांनी भूमिका मांडली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या मोठ्या संख्येतील भाविकांपर्यंत संत रविदास महाराजांचे विचार पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

संत रविदास महाराजांच्या विचारांवर आधारित हे अभियान सामाजिक समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button