दहीहंडी फुटली अन् विद्यार्थ्यांच्या हाती आली पुस्तके!
बधे महाविद्यालयाचा अभिनव ‘पुस्तक दहीहंडी’ उपक्रम; वाचनसंस्कृतीला उत्सवाची जोड

कोंढवा | प्रतिनिधी : दहीहंडीच्या पारंपरिक उत्सवाला वाचनसंस्कृतीची अनोखी जोड देत माऊली प्रतिष्ठान संचालित श्रीमती कलावती बधे कला व वाणिज्य महाविद्यालय, कोंढवा बुद्रुक येथे ‘पुस्तक दहीहंडी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी मैत्री वाढावी आणि विविध साहित्यप्रकार विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दहीहंडी हा केवळ उत्सव आणि जल्लोष न राहता त्यातून ज्ञान, वाचन आणि संस्कारांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या संकल्पनेतून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तक दहीहंडी’ साकारण्यात आली. पारंपरिक दही किंवा लोण्याऐवजी या दहीहंडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची पुस्तके आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती.

या दहीहंडीमध्ये कथा, कादंबऱ्या, महापुरुषांची चरित्रे, नाटके, कविता तसेच विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने दहीहंडी फोडल्यानंतर आपापल्या आवडीची पुस्तके निवडून ती घरी नेली. विशेष म्हणजे ही सर्व पुस्तके महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली. त्यामुळे उत्सवाच्या आनंदासोबत विद्यार्थ्यांना ज्ञानाची अनमोल भेट मिळाली.

या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रतीक्षा मंडोळे, प्रा. ज्योती अंकम, प्रा. रोहिणी माने तसेच कार्यालयीन अधीक्षक सौ. स्वरांजली भालेराव यांनी केले.
महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदीप (नाना) मारुती बधे तसेच माऊली प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सौ. प्रितीताई संदीप बधे यांनी कौतुक केले. तसेच प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या ‘पुस्तक दहीहंडी’मध्ये सीमा वाघमारे, अंजली गव्हाणे, मुस्कान पठाण, रणवीर अहिवळे, शुभम पठारे, आकांक्षा आदनकर, श्रुती हौसारे, आस्मा मुलानी, शीतल जाधव, ओंकार तारु, अभिजीत सुतार, ओंकार शिंदे आणि मानसी पठारे या विद्यार्थी प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेतला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा पुस्तकांशी संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे दहीहंडीसारख्या पारंपरिक उत्सवाला वाचनसंस्कृतीची जोड देण्याचा प्रयत्न आम्ही केला. ‘पुस्तक दहीहंडी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्सवाचा आनंद घेतानाच आपल्या आवडीची पुस्तके घरी नेली, हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे. विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण करून ज्ञानाची ही परंपरा अधिक समृद्ध करणे, हा आमचा उद्देश आहे.”
– प्रा. प्रमोद धिवार, प्राचार्य, श्रीमती कलावती बधे कला व वाणिज्य महाविद्यालय





