Maharashtra MLC Election Results 2026 : विधान परिषदेच्या पाच जागांचा आज निकाल; महायुती-मविआची प्रतिष्ठा पणाला
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील १८२ उमेदवारांचे भवितव्य ठरणार; पुणे पदवीधरमध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार, अमरावती शिक्षक मतदारसंघात ९१.०८ टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या पदवीधर मतदारसंघांसह पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार
पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार निवडणूक लढवत होते. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात ४१, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात होते. अमरावती शिक्षक मतदारसंघात २६ आणि पुणे शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवारांनी नशीब आजमावले.
पाच मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी
मतदानाच्या आकडेवारीनुसार, अमरावती शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९१.०८ टक्के मतदान झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के, नागपूर पदवीधर मतदारसंघात ६४.७६ टक्के, पुणे पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात ५८.६७ टक्के मतदान नोंदविण्यात आले.
हेही वाचा – संत रविदास महाराजांच्या विचारांचा घराघरांत प्रसार; नोव्हेंबरपासून राज्यव्यापी अभियान
कोणामध्ये झाली प्रमुख लढत?
नागपूर पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत झाली.
पुणे पदवीधर मतदारसंघ : भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ : सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली.
अमरावती शिक्षक मतदारसंघ : किरण सरनाईक, अदिती पोहरे, संगिता शिंदे आणि दत्तात्रय लहाने यांच्याकडे लक्ष लागले होते.
पुणे शिक्षक मतदारसंघ : भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेना (शिंदे गटाचे) सचिन सानप, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे दत्तात्रय सावंत यांच्यात चौरंगी लढत झाली.
कुठे झाली मतमोजणी?
पाचही मतदारसंघांसाठी संबंधित केंद्रांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती.
- नागपूर पदवीधर मतदारसंघ : मानकापूर क्रीडा संकुल, नागपूर
- अमरावती शिक्षक मतदारसंघ : लोकशाही भवन, अमरावती
- पुणे पदवीधर मतदारसंघ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
- पुणे शिक्षक मतदारसंघ : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे
- छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ : एमआयडीसी, चिकलठाणा
या पाचही मतदारसंघांतील निकालांच्या आधारे विधान परिषदेतील पक्षीय समीकरणांबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.




