दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर निर्बंध; मराठी सेलिब्रिटींनी जनजागृतीत सहभागी व्हावे – उच्च न्यायालय
कलाकारांनी विनामूल्य मोहिमेत सहभागी व्हावे; जाहिरातबाजीसाठी जनतेचा पैसा खर्च न करण्याचे राज्य सरकारला निर्देश

मुंबई : दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कानठळ्या बसवणारे आवाज करणारे फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश देतानाच, प्रदूषणाविरोधात व्यापक जनजागृती करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या मोहिमेत मराठी कलाकार आणि समाजातील प्रसिद्ध व्यक्तींनी स्वतःहून सहभागी व्हावे, असे आवाहनही न्यायालयाने केले.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सण-उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनी आणि हवेच्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने प्रदूषण नियंत्रणासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्यावर भर दिला.
जनजागृतीसाठी कलाकारांनी पुढाकार घ्यावा
मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांनी कलाकारांना भरपूर संधी आणि ओळख दिली आहे. त्यामुळे या शहरांप्रती सामाजिक बांधिलकी जपत प्रदूषणविरोधी मोहिमेत कलाकारांनी योगदान द्यावे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. मराठी कलाकार आणि सेलिब्रिटींना एकत्र घेऊन जनजागृती मोहीम राबविण्याची सूचनाही न्यायालयाने केली.
मात्र, या मोहिमेसाठी कलाकारांचे मानधन किंवा जाहिरातबाजीवर जनतेच्या पैशाचा खर्च करू नये, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने राज्य सरकारला दिली. कलाकारांनी सामाजिक जबाबदारी म्हणून विनामूल्य सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली.
सरकारी जनजागृती मोहिमेची माहिती सादर
राज्य सरकारने दूरचित्रवाणी, रेडिओ आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेची माहिती न्यायालयात सादर केली. या उपक्रमांची दखल घेत न्यायालयाने समाधान व्यक्त केले. तसेच, जनजागृती मोहिमेत सेलिब्रिटींचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याची सूचना केली.
महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश
यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रणासाठी आणि जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांचा सविस्तर अहवाल महिनाभराच्या आत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दिवाळीसारख्या सणाच्या काळात नागरिकांचा आनंद आणि सार्वजनिक आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी ध्वनी व वायुप्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर न्यायालयाने भर दिला आहे.




