प्रभाग क्र. ८ मध्ये दसरा चौक ते आरटीओ कार्यालय मार्गावरील झाडा-झुडपांची छाटणी
वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत : डॉ. सुहास कांबळे यांच्या पुढाकाराने रस्ता दुभाजकाची स्वच्छता युद्धपातळीवर

पिंपरी-चिंचवड | प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा नगरसेवक डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे यांच्या पुढाकाराने मोशी प्राधिकरण परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकाची स्वच्छता आणि झाडा-झुडपांच्या छाटणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
सेक्टर क्रमांक ४, संतनगर, मोशी प्राधिकरण परिसरातील दसरा चौक ते महाराजा चौक मार्गे आरटीओ कार्यालय कॉर्नरपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकामध्ये झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. वाढलेल्या फांद्या रस्त्याच्या दिशेने पसरल्यामुळे वाहनचालकांच्या दृश्यमानतेवर परिणाम होत होता. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत डॉ. सुहास कांबळे यांच्याकडे तक्रार केली होती.
नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत डॉ. कांबळे यांनी तातडीने संबंधित महापालिका यंत्रणेशी संपर्क साधला. दुभाजकातील अनावश्यक वाढलेली झाडे आणि झुडपे छाटण्यासह परिसराची संपूर्ण साफसफाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार कामाला तत्काळ सुरुवात करण्यात आली असून, दुभाजक स्वच्छ आणि सुव्यवस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा
या कामाबाबत बोलताना डॉ. सुहास कांबळे म्हणाले, “प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. रस्त्यावरील झाडा-झुडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार मिळताच संबंधित यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येचे वेळेत आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.” ‘तक्रार निवारण’ उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या या कामामुळे वाहनचालकांना रस्ता अधिक स्पष्टपणे दिसणार असून, वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. परिसराचे सौंदर्यही वाढणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या तत्पर कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य असून, प्रभागातील स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी नमूद केले.
“प्रभागातील नागरिकांची सुरक्षितता आणि त्यांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. रस्ता दुभाजकातील वाढलेल्या झाडा-झुडपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार मिळताच संबंधित यंत्रणेला तातडीने छाटणी व साफसफाईच्या सूचना दिल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची तत्परतेने दखल घेऊन प्रभावी निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”
– डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे, नगरसेवक तथा सदस्य, शहर सुधारणा समिती.




