पर्यावरण संवर्धनाचा संदेश: पुनावळेतील काटेवस्ती फॉरेस्टमध्ये भव्य वृक्षारोपण!
‘ग्रीन रिइमॅजिंड’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती
पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या उभारणीचा संदेश देण्यासाठी यशदा रियल्टी आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीन रिइमॅजिंड’ या भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन पुनावळे येथील काटेवस्ती फॉरेस्टमध्ये करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या उपक्रमाला विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
वेगाने होणारे शहरीकरण आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखणे, शहराचे सौंदर्य टिकविणे आणि भावी पिढ्यांसाठी अधिक हिरवेगार वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. ‘ग्रीन रिइमॅजिंड’च्या ब्रँड ॲम्बेसेडर तथा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे उपक्रमाला विशेष ऊर्जा आणि नवचैतन्य लाभले.
वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
हेही वाचा – उपवास : श्रद्धेपुरता नव्हे, उपचार म्हणूनही… पण वैद्यकीय सल्ल्यानेच!
वृक्षारोपणाइतकेच वृक्षसंवर्धन महत्त्वाचे : शत्रुघ्न काटे
“पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसराचा वेगाने विकास होत असताना निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यशदा रियल्टी आणि सकाळ माध्यम समूहाने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे जतन आणि संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरवेगार आणि सुदृढ भविष्य घडविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी व्हावे,” असे आवाहन शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी माजी आमदार अश्विनी जगताप, यशदा रियल्टीचे चेअरमन वसंतशेठ काटे, नगरसेविका श्रुती वाकडकर, रेश्मा भुजबळ, अनिता काटे, कुंदा भिसे, जयनाथशेठ काटे, रामभाऊ वाकडकर, चेतन भुजबळ, कैलासशेठ कुंजीर, राजाभाऊ मासूळकर, संजयशेठ भिसे, संदेश काटे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, सकाळ माध्यम समूहाचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. पुनावळे परिसरातील हिरवाई वाढविण्यासाठी तसेच लावलेल्या वृक्षांचे सातत्याने संगोपन करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





