TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कायदा-सुव्यवस्था बिघडली तर फडणवीस जबाबदार’; जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघाती हल्लाबोल

‘फडणवीसांचा मला फोन आला होता’; 12 सप्टेंबरला अंतरवालीत येण्याचे आवाहन, उदय सामंतांची उपोषण सोडण्याची विनंती

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. राज्य सरकारने अद्याप सर्व मागण्या मान्य न केल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

‘फडणवीसांचा मला फोन आला होता’

मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला की, हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन केला होता. या जीआरनुसार एकही मराठा वंचित राहणार नाही, असे फडणवीसांनी सांगितल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

‘मला फडणवीसांचा फोन आला होता. ते नाही म्हटलं तर मी सगळं सांगतो. आमच्याकडे CCTV फुटेजही आहेत,’ असा दावा करत जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

‘फडणवीसांनी सांगितलं म्हणून आम्ही विश्वास ठेवला. फक्त सातारा आणि कोल्हापूरमध्ये दोन महिने थांबा, असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना भाऊ म्हटलं. मला राजकारणाचं देणं-घेणं नाही, असंही मी सांगितलं होतं,’ असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

‘सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे’

राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जाणूनबुजून हयगय आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. ‘मराठ्यांचा रोष वाढत आहे. मराठा समाज संपवण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा सुरू आहे,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सरकारला 12 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. मागील वर्षभरात आश्वासनांनंतरही मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा –  तुकाराम मुंढेंची सोशल मीडियावरही ‘डंका’; फडणवीस-शिंदेंनाही टाकलं मागे

‘कायदा-सुव्यवस्था बिघडली तर फडणवीस जबाबदार’

राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. ‘हे मोदी आणि अमित शहा यांनी लक्षात ठेवावे,’ असेही ते म्हणाले.

‘एकदा लाट उसळली तर दिल्लीपर्यंत जाऊ शकतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फडणवीसांना समजून सांगावे. देवेंद्र फडणवीसांमुळे आंदोलन चिघळू शकते,’ असा दावा त्यांनी केला.

मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येऊ शकतात, असे सांगत जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

एकनाथ शिंदेंवरही टीका

जरांगे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय कुटुंबांवरूनही फडणवीसांवर टीका केली. तसेच कोल्हापूर आणि साताऱ्याच्या राजघराण्यांवरही त्यांनी भाष्य केले.

एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी बोचरी टीका केली. ‘एकनाथ शिंदे म्हणायला मला आता लाज वाटते. त्यांनी मराठ्यांचा तळतळाट घेतला,’ असे जरांगे पाटील म्हणाले.

उदय सामंतांची उपोषण सोडण्याची विनंती

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑनलाइन बैठक घेतली असून, त्यामध्ये अधिकारीही सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले.

‘तुमच्या माध्यमातून मी जरांगे पाटील यांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. प्रश्न सुटत राहणार आहेत; मात्र आपली प्रकृती आणि आपला जीवही महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित करावे,’ असे उदय सामंत म्हणाले.

यासोबतच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, हे महायुती सरकारचे धोरण असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षण अबाधित राहील, असे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group