Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबमध्ये भाजप-अकाली दलाची युती पुन्हा; मुख्यमंत्रीपद अकाली दलाकडे!

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ११७ जागांवर एकत्र लढणार; अमित शाह यांची घोषणा, जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही

नवी दिल्ली : पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल यांनी सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा युती केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. आगामी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष सर्व ११७ जागांवर एकत्र निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे, या युतीत अकाली दल मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल आणि मुख्यमंत्रीपदही याच पक्षाकडे राहील, असे शाह यांनी स्पष्ट केले.

अमित शाह म्हणाले, “अकाली दल पंजाबमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. भाजप आणि अकाली दल मिळून सर्व ११७ जागांवर निवडणूक लढवतील. मोठा भाऊच मुख्यमंत्री होतो.” या विधानामुळे युती सत्तेत आल्यास मुख्यमंत्रीपद अकाली दलाकडे राहण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा विशिष्ट उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

जागावाटपाचा निर्णय चर्चेतून

जागावाटपाबाबत विचारले असता, दोन्ही पक्ष एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील, असे अमित शाह यांनी सांगितले. अकाली दल आजपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) अधिकृत मित्रपक्ष म्हणून काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“आम्ही यापूर्वी अनेक निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. या प्रवासात विजय आणि पराभव दोन्ही पाहिले आहेत. मात्र, आमचे नाते अतूट आहे,” असे शाह म्हणाले.

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनीही या युतीचे स्वागत केले. पंजाबमधील सर्वसामान्य जनता, विविध समाजघटक आणि धर्मांतील लोकांची भाजप-अकाली दलाने एकत्र यावे, अशी इच्छा होती. ही युती जनभावनांचे प्रतिबिंब असल्याचे बादल यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनामुळे २०२० मध्ये तुटली होती युती

भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय युती होती. मात्र, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये अकाली दलाने भाजपसोबतची २४ वर्षांची युती तोडली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी २०२२ ची पंजाब विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. या निवडणुकीत भाजपला दोन, तर अकाली दलाला तीन जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकत पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली.

हेही वाचा –  सचिन तापकीर यांच्या पाठपुराव्याला यश, खंडोबामाळचा प्रलंबित रस्ता अखेर खुला!

भाजप-अकाली दलाची युती किती वेळा यशस्वी?

भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांनी यापूर्वी १९९७, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ अशा पाच विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. यापैकी १९९७, २००७ आणि २०१२ मध्ये युतीला सत्ता स्थापन करण्यात यश आले. तर २००२ आणि २०१७ मध्ये युतीला पराभवाचा सामना करावा लागला.

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ : ११७ जागांचे निकाल

  • आम आदमी पक्ष – ९२ जागा
  • काँग्रेस – १८ जागा
  • शिरोमणी अकाली दल – ३ जागा
  • भाजप – २ जागा
  • बहुजन समाज पक्ष – १ जागा
  • अपक्ष – १ जागा

पंजाब लोकसभा निवडणूक २०२४ : १३ जागांचे निकाल

  • काँग्रेस – ७ जागा
  • आम आदमी पक्ष – ३ जागा
  • शिरोमणी अकाली दल – १ जागा
  • अपक्ष – २ जागा
  • भाजप – एकही जागा नाही

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अकाली दलाची पुन्हा झालेली युती पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, जागावाटप, प्रचाराचे मुद्दे आणि निवडणुकीतील रणनीती याबाबत पुढील काळात दोन्ही पक्ष कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group