स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल रॅली!
शिक्षण विश्व : PDEA तर्फे आयोजन; देशभरातील सायकलपटूंचा सहभाग

पुणे | पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA) आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया तसेच सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २२ जुलै रोजी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार असून, राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पुणे ते बारामती असा सायकलपटूंचा प्रवास होणार असून, राज्यासह देशभरातील नामांकित सायकलपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुणे आणि बारामती या दोन ऐतिहासिक शहरांना जोडणाऱ्या या स्पर्धेमुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच युवकांमध्ये आरोग्य, शिस्त आणि क्रीडासंस्कृतीचा संदेश पोहोचणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सकाळी ८ वाजता पुण्यातील शनिवारवाडा येथे होणार असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुनील तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार पार्थ पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता हडपसर येथील ‘ब्लायंडिंग सेंटर’ येथे मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महारक्तदान
स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा दुपारी २ वाजता बारामती येथील गदिमा सभागृहात होणार असून, यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, क्रीडा क्षेत्रातील नवोदितांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहेत. क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संगम
पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून, क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम म्हणून पाहिली जात आहे. स्व. अजितदादा पवार यांनी शिक्षण आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या उपक्रमामुळे युवकांना निरोगी जीवनशैलीची प्रेरणा मिळणार असून, सायकलिंगसारख्या पर्यावरणपूरक आणि साहसी क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच, पुणे ते बारामती या मार्गावर क्रीडामय वातावरण निर्माण होऊन राज्यातील क्रीडा चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.





