Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

खाद्य व्यवसायात आधी नियमभंग केलेल्या व्यावसायिकांची सर्व माहिती आता एका क्लिकवर

पुणे : खाद्य व्यवसायातील नियमभंग करणाऱ्या आस्थापनांचा संपूर्ण इतिहास आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. एखाद्या व्यावसायिकाने यापूर्वी अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन केले आहे का, त्याच्यावर कोणती कारवाई झाली होती, तसेच त्याच्या नावावर इतर कोणत्या आस्थापना आहेत, याची माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने एकात्मिक ऑनलाइन प्रणालीतून उपलब्ध होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.

मुंढे म्हणाले, ‘एफडीएचे लक्ष केवळ भेसळयुक्त अन्नावरील कारवाईपुरते मर्यादित नसून, अन्न उत्पादनापासून ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण साखळीतील अन्नसुरक्षा मानकांचे पालन होत आहे का, यावर आहे. उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि वितरण या प्रत्येक टप्प्यावर अन्नसुरक्षेच्या २२ निकषांचे पालन होते की नाही, याची तपासणी केली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.’

हेही वाचा –  होर्मुजमधून भारतीय जहाजांची वाहतूकच जास्त… इराणकडे परवाना अर्ज करण्यात भारत आघाडीवर

नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा निपटारा अधिक परिणामकारक करण्यासाठी ‘एफडीए’ने complaints.mahafda.in हे ऑनलाइन तक्रार पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर दाखल झालेल्या प्रत्येक तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत कारवाई करणे बंधनकारक असेल. निर्धारित वेळेत कार्यवाही न झाल्यास त्याची माहिती आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाईल आणि संबंधित अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात येईल,’ असे त्यांनी नमूद केले.

मुंढे म्हणाले, ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे एका व्यक्तीच्या नावावर असलेल्या विविध खाद्य किंवा औषध व्यवसायांची परस्पर सांगड घालणे शक्य होणार आहे. एखाद्या आस्थापनेत नियमभंग आढळल्यास त्याच व्यक्तीच्या इतर व्यवसायांचीही तपासणी करता येईल. तसेच, संबंधिताने यापूर्वी कोणते उल्लंघन केले, त्याच्यावर कोणती कारवाई झाली, याचा संपूर्ण इतिहासही उपलब्ध होणार असल्याने कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल.’

देशात हृदयविकार, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यामागे बदललेली आहारशैली हे महत्त्वाचे कारण असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. उत्पादन खरेदी करताना केवळ किंमत किंवा ‘एक्स्पायरी डेट’ तपासून न थांबता त्यामधील अन्नघटक, पोषणमूल्ये आणि गुणवत्ता यांचीही ग्राहकांनी माहिती करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button