माउलींचा पालखी सोहळा आज ‘बरड’मुक्कामी! सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम; उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

सातारा : ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥’ अभंग मुखी ठेवत साताऱ्याचा पाहुणचार घेऊन माउलींची पालखी आता पंढरीच्या समीप पोहोचत आहे. जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी विठ्ठल भेटीची ओढ वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
‘ज्ञानोबा-माउली-तुकाराम’च्या जयघोषात, विठुनामाचा गजर आणि मृदंगाच्या तालावर थिरकणाऱ्या पावलांनी संपूर्ण फलटण नगरी भारावून गेली आहे. ऐतिहासिक फलटण नगरीचं आदरातिथ्य स्वीकारून जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज, शनिवारी सातारा जिल्ह्यातील आपल्या शेवटच्या मुक्कामासाठी ‘बरड’ गावाकडे मार्गस्थ झाला. हा सोहळा आज (रविवारी) दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
शनिवारी सकाळी सहा वाजता पालखीने फलटणमधून प्रस्थान ठेवले. शहराबाहेर नीरा उजवा कालव्यावरील रावरामोशी पूल येथे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. त्यानंतर विडणी येथे सरपंच व ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साही स्वागत केले, जेथे वारकऱ्यांनी न्याहारी व अल्प विश्रांती घेतली. दुपारच्या भोजनासाठी सोहळा पिंप्रद येथे पोहोचला. तेथे माउलींच्या पादुकांना पवित्र स्नान घालून वारीतील सर्व दिंड्यांच्या वतीने नैवेद्य दाखवण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. दुपारनंतर वाजेगाव येथे अर्ध्या तासाचा विसावा घेऊन सोहळा बरडकडे रवाना झाला.
हेही वाचा – UPI पेमेंट महागणार… MDR लागून झाल्यानंतर तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
पाऊले चालती पंढरीची वाट । सुख वाटे जीवा आनंद थोर।
हा अभंग मुखी धरत वारकरी पंढरीच्या दिशेने मोठ्या उत्साहात चालत होते.लाखो वारकऱ्यांची उपस्थिती लक्षात घेता सातारा जिल्हा प्रशासन आणि बरड ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स आणि तात्पुरत्या शौचालयांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, तर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. पंढरीच्या ओढीने निघालेला हा वैष्णवांचा सागर अनुभवण्यासाठी संपूर्ण बरड नगरी सज्ज असून परिसरात चैतन्याचे वातावरण आहे. शुक्रवारी फलटण येथे पालखी पोहोचतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तरीही वारकऱ्यांच्या मुखी माउलींचा आणि हरिनामाचा गजर कायम होता. रात्री उशिरापर्यंत भजन कीर्तन आणि जागरणात वारकरी तल्लीन झाले होते.
फलटण येथे पालखी सोहळ्यात माउलींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मोटारी समोरासमोर धडकल्याने पुसेगाव (ता खटाव) येथे रात्री अपघात झाला. या अपघातात आठ वारकरी महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





