ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना

पिंपरी | कचरा व्यवस्थापनात नागरिकांच्या सहभागातून सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसून येत आहे. महापालिकेच्या शून्य कचरा संकलन (झिरो वेस्ट स्लम) उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या महिनाभरात ११.४७ टन कचऱ्याचे स्रोतस्तरावर विलगीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमात १९ हजार ८०५ घरांनी सहभाग नोंदविला आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, महिनाभरात कालावधीत ९.९७ टन ओला कचरा आणि १.५० टन सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. याशिवाय, ६४३ किलो सॅनिटरी कचऱ्याचे सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले. कचऱ्याच्या वर्गीकरणामुळे पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती प्रक्रियेला गती मिळत असून, पर्यावरणीय परिणाम कमी करण्यास मदत होत आहे.

कचरा डेपोवरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी महापालिकेकडून शून्य कचरा संकल्पना राबविण्यात येत आहे. घराघरांत ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करण्याची सवय वाढत असल्याने कचऱ्याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाला बळ मिळत आहे.

हेही वाचा

मुंबई लोकल की बार? धावत्या ट्रेनमध्ये तरुणांची मद्यपार्टी, व्हिडिओ व्हायरल..

याबाबत महापौर रवि लांडगे म्हणाले, शून्य कचरा संकलन उपक्रमाला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही पिंपरी चिंचवडकरांच्या पर्यावरणाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष आहे. स्रोतस्तरावर कचऱ्याचे विलगीकरण केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीलाही चालना मिळते. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय कायम ठेवावी.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आवाहन करताना सांगितले की, शहर स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा अशा चार प्रकारांत कचरा विलगीकरणाची सवय कायम ठेवावी. नागरिकांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची जमेची बाजू ठरत असून, ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही संकल्पना अधिक बळकट होत आहे.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, कचरा व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. झिरो वेस्ट स्लम उपक्रमामुळे कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण वाढत असून, कचरा संकलन आणि प्रक्रियेमध्ये कार्यक्षमता निर्माण होत आहे. नागरिकांनी या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होऊन शहराच्या स्वच्छता चळवळीला बळ द्यावे.

कचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण केल्यास त्याचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि सुरक्षित विल्हेवाट लावणे अधिक सुलभ होते. ओला कचरा कंपोस्ट निर्मितीसाठी, तर सुका कचरा पुनर्वापरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक घरातून चार प्रकारांत कचरा विलगीकरण होणे ही काळाची गरज आहे, असे मत उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button