विधानपरिषदेच्या ११ पैकी तब्बल ‘इतक्या’ जागांवर महायुतीचा विजय; जाणून घ्या संपूर्ण निकाल…

Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीने एकतर्फी वर्चस्व गाजवत दणदणीत विजय मिळवला आहे.
नाशिकच्या एका जागेचा अपवाद वगळता नागपूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, नांदेड, सांगली-सातारा, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या सर्वच प्रमुख जागांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. तर राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला आहे.
नागपूर –
भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा ५५२ मतांच्या फरकाने पराभव केला. डॉ. राजीव पोतदार (भाजप): ६८२ मते तर अतुल लोंढे (काँग्रेस) १३० मते मिळाली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या १६९ मतदारांपैकी लोंढे यांना केवळ १३० मते मिळाली. याचा अर्थ पक्षाची ३९ मते कमी झाल्याचे स्पष्ट होते.
धाराशिव-बीड-लातूर-
धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघात भाजपच्या बसवराज पाटील यांनी काँग्रेसच्या महेश देशमुख यांना पराभवाची धूळ चारली. महायुतीचे भाजप उमेदवार बसवराज पाटील यांनी ८४५ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, या ठिकाणी १४ मते बाद झाली. बसवराज पाटील (भाजप): ८४५ मते तर महेश देशमुख (काँग्रेस): १२४ मते मिळाली.
सांगली-सातारा –
हाय-व्होल्टेज ठरलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अखेर महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव केला. धैर्यशील कदम (भाजप): ५९३ मते तर अभयसिंह जगताप (मविआ – शरद पवार गट): २९२ मते मिळाली. येथे विजयासाठी ४४३ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता तर ९ मते अवैध ठरली.
हेही वाचा – पुण्यापाठोपाठ मुंबईत वरुणराजाचे आगमन! पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
जळगाव –
जळगावमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी महाविकास आघाडीच्या शरद तायडे यांचा दारूण पराभव केला. नंदकिशोर महाजन (भाजप): ५७७ हून अधिक मते तर शरद तायडे (मविआ): केवळ ५ मते मिळाली.
छत्रपती संभाजीनगर-जालना
छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुहास त्र्यंबकराव शिरसाठ यांनी मोठी आघाडी घेत मतांचा कोटा पूर्ण केला. सुहास शिरसाठ (भाजप) ४५५ मते तर गणेश लोखंडे (शिवसेना ठाकरे गट) १३५ मते आणि इसाक खान (अपक्ष/MIM पाठिंबा) ३५ मते मिळाली.
अमरावती
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रवीण पोटे (भाजप): ३९० मते, तर निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी) ३१ मते आणि हर्षजित देशमुख (काँग्रेस) ०० मते मिळाली.
सोलापूर
भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंतराव देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला. राजेंद्र राऊत (भाजप) ४८३ मते तर वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी) यांना ११८ मते मिळाली.
नांदेड
नांदेडमध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर यांनी २५५ मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला.अमरनाथ राजूरकर (भाजप): ३३९ मते तर कृष्णा पाटील आष्टीकर (मविआ) ८४ मते आणि प्रशांत इंगोले (वंचित बहुजन आघाडी) ५ मते
भंडारा-गोंदिया
भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावरील अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव केला. अविनाश ब्राह्मणकर (भाजप): ३०४ मते, तर नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा): १५२ मते
परभणी-हिंगोली
परभणी-हिंगोलीत शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाले. त्यांनी मविआचे विवेक नवंदर यांचा पराभव केला. सईद खान (शिवसेना महायुती) २४२ मते तर विवेक नवंदर (मविआ) दुसऱ्या क्रमांकावर
नाशिक
नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला असून अपक्ष उमेदवार गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला आहे. येथे विजयाचा कोटा ३०३ मतांचा होता. गिते (अपक्ष): ३५७ मते
तर नरेंद्र दराडे (महायुती): २४८ मते मिळाली.
नाशिकमध्ये एकूण ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदान केले होते, ज्यातील १३ मते अवैध ठरल्याने विजयाचा कोटा ३०३ निश्चित करण्यात आला होता. या पहिल्याच पसंतीक्रमाच्या फेरीत गोकुळ गीते यांनी तब्बल ३५७ मते मिळवत महायुतीचे अधिकृत उमेदवार दराडे (२४८ मते) यांना पराभूत केले. या धक्कादायक निकालानंतर मतमोजणी केंद्रावर दराडे आणि गीते समर्थक आमने-सामने आल्याने काही काळ धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा प्रकार घडला.
बिनविरोध निवड
तर ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या ६ मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावरून स्पष्ट होते की, राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. यात भाजप ११, शिवसेना (शिंदे) ३ आणि राष्ट्रवादी २ जागांवर विजयी झाली आहे.





