तणावातून यशाकडे – योग, ध्यान आणि सकारात्मक संकल्पशक्तीचा प्रवास”
योग दिवस विशेष कार्यक्रम : “विद्याशरणम् प्राणिक स्टुडिओतर्फे २१ जून रोजी ध्यान व मार्गदर्शन सत्राचे आयोजन

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शरीर व मनाचे संतुलन साधत तणावमुक्त जीवनाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम येत्या २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. “From Stress to Success – Manifestation Through Yoga & Meditation” या संकल्पनेवर आधारित हे मार्गदर्शन व ध्यान सत्र सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत अत्रे रंगमंदिर येथे पार पडणार आहे.
हा उपक्रम विद्याशरणम् प्राणिक स्टुडिओ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, १६ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी तो खुला आहे. या सत्रात सुमारे ५०० नागरिक एकाच वेळी सामूहिक ध्यान साधना करणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा – महाडा इमारतीतील गॅलरीत अडकलेल्या विद्यार्थिनीची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती लीना खणके (प्रमाणित प्राणिक हीलर, वरिष्ठ प्राणिक हीलिंग प्रशिक्षक आणि समग्र जीवन मार्गदर्शक) सहभागी होणार असून, त्या तणाव व्यवस्थापन, सकारात्मक ऊर्जा वृद्धी, ध्यान साधना तसेच “मॅनिफेस्टेशन”च्या माध्यमातून यशाकडे वाटचाल कशी करता येते याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत वाढता ताण, मानसिक अस्वस्थता आणि असंतुलन यांचा परिणाम आरोग्य, नातेसंबंध आणि व्यावसायिक यशावर होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर योग आणि ध्यानाच्या माध्यमातून मानसिक स्थैर्य मिळविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या संस्थापक साक्षी जैन यांनी नागरिकांनी या प्रेरणादायी सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. योग दिनाच्या निमित्ताने होणारे हे विशेष सत्र सहभागींसाठी आत्मशांती, सकारात्मकता आणि जीवनदृष्टी बदलण्याची संधी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. कार्यक्रमात सामूहिक ध्यान, मार्गदर्शित मेडिटेशन आणि व्यवहारिक तणाव व्यवस्थापन तंत्र यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती अंकीता पोरवाल यांनी दिली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“योग आणि ध्यान हे केवळ शारीरिक आरोग्य सुधारण्याचे साधन नाही, तर ते मनाच्या खोल स्तरावर स्थैर्य निर्माण करणारी एक जीवनशैली आहे. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात आपण अनेकदा बाह्य यशाच्या मागे धावताना आतली शांतता हरवून बसतो. अशा वेळी योग आणि ध्यान आपल्याला स्वतःकडे परत आणतात, मन शांत करतात आणि विचारांना स्पष्टता देतात. जेव्हा मन शांत आणि केंद्रित होते, तेव्हा निर्णयक्षमता सुधारते, नातेसंबंध अधिक समृद्ध होतात आणि कामामध्येही अधिक सकारात्मक परिणाम दिसू लागतात. खरे यश हे फक्त बाह्य उपलब्ध्यांमध्ये नसते, तर ते आतल्या समाधानात आणि संतुलनात असते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने दररोज काही क्षण स्वतःसाठी, श्वासासाठी आणि शांततेसाठी राखणे आवश्यक आहे. कारण आतली शांतता मिळाली की बाहेरचे जग अधिक सुंदर, सुसंगत आणि संधींनी भरलेले वाटू लागते.”
— साक्षी जैन, संस्थापक.





