Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘धुळे – नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एनसीपीए येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित माजी खासदार दिवंगत अण्णासाहेब उपाख्य चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य‘ या जीवनचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार अमरीशभाई पटेल, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, सौरभ शुक्ला, विनय सहस्रबुद्धे , कुणाल पाटील, माजी आमदार जयंत पाटील, चित्रा वाघ उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, धुळे जिल्ह्याने अनेक दशकांपासून महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. या भागातील मानवी संसाधने, उद्योग, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील क्षमता लक्षात घेऊन राज्याच्या नव्या विकास आराखड्यात या दोन्ही जिल्ह्यांना महत्वाचे स्थान दिले जाणार आहे.

दिवंगत अण्णासाहेब चुडामण पाटील यांचे जीवन म्हणजे संघर्ष, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आर्थिक संकटामुळे गिरणीत नोकरी स्वीकारलेल्या अण्णासाहेबांनी अन्यायाविरोधात लढा उभारला. स्वातंत्र्यलढ्यात मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह आणि ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेत दोन वर्षांचा कारावास भोगला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि पंडित नेहरू यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांना स्वतःला शिक्षण घेता आले नाही, मात्र समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी केली. शाळा, महाविद्यालये, तसेच पुढे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे जाळे उभे राहिले. अण्णासाहेबांनी रोवलेले हे बीज पुढील पिढ्यांनी जोपासत मोठा विस्तार घडवून आणल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

हेही वाचा –  ‘गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल’; मंत्री नरहरी झिरवाळ

अण्णासाहेब सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आले. मात्र ‘अजिंक्य’ ही उपाधी त्यांना केवळ निवडणूक विजयांमुळे मिळालेली नाही. शिक्षण, सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य, जोडलेली माणसे आणि लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हेच त्यांच्या अजिंक्यत्वाचे खरे कारण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘अजिंक्य’ हा चरित्रग्रंथ केवळ अण्णासाहेबांच्या जीवनाचा आलेख नसून धुळे जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय इतिहासाचाही महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे, असे त्यांनी नमूद केले.

धुळे जिल्ह्याने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी अनेक व्यक्तिमत्वे महाराष्ट्राला दिली आहेत. या जिल्ह्यातील क्षमता आणि कर्तृत्व पाहता हा जिल्हा ‘नररत्नांची खाण’ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आमदार अमरीश पटेल यांच्यासारख्या उद्योजकांनी ग्रामीण भागात उभे केलेले विकास मॉडेलही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अजिंक्य’ या चरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि समाजहिताची भावना असेल तर मोठे परिवर्तन घडविता येते, हा संदेश अण्णासाहेबांच्या जीवनातून मिळतो. त्यामुळे हा ग्रंथ धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल पाटील यांनी केले.

यावेळी लेखकाच्या पत्नी इंदुमती सोमनाथ पाटील यांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button