ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाच्या आढावा बैठकीत ‘रणनीती’!

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना घराघरांत पोहोचवणार

– सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश श्री निरंजन डावखरे यांचा निर्धार!

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड, पुणे उत्तर आणि मावळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विभागीय आढावा बैठक बुधवारी उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक कार्यक्रम, केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा जनतेपर्यंत प्रभावी प्रचार आणि पक्ष संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीस भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख, अभियान प्रदेश सहसंयोजक विक्रम पाचपुते आणि जिल्हा प्रभारी भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पुणे उत्तर (मावळ) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.

‘मोदी सरकारची यशस्वी वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या राज्यव्यापी महाअभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या चार प्रमुख कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

यामध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात एका दिवसात किमान १५ हजार वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण आठवड्यात एक लाखांहून अधिक वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन शहरातील विविध योग संस्था, पतंजली परिवार आणि नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

हेही वाचा –  संविधानाची प्रत हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री

याशिवाय २५ जून रोजी आणीबाणीच्या ५१व्या वर्षानिमित्त मंडल स्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित करून त्या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदींचा सत्कार करण्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळातील घटनांवर व्याख्याने आणि जनजागृती कार्यक्रमही राबविले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील विविध मंडलांमध्ये प्रदर्शने आयोजित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ स्वरूपात प्रसारित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

बैठकीत पक्षाच्या ‘एसआयआर’ (SIR) नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात आला. भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत सुमारे ४० टक्के नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिली. पुढील १५ दिवसांत हा आकडा ५० टक्क्यांहून अधिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे यांनी पिंपरी-चिंचवड भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावरील उपक्रम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात पिंपरी-चिंचवड शहर नेहमीच राज्यात आघाडीवर राहिले असून, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि एसआयआर नोंदणीतील प्रगती समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस आमदार महेश लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, माजी खासदार अमर साबळे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार अश्विनी जगताप, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र व मावळ परिसरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन योगेश बाचलं यांनी केले, तर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवड भाजप संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभाग आणि मंडल स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहोत. पर्यावरण संवर्धन, योग दिन, आणीबाणी जनजागृती आणि केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा निर्धार आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाच्या बळावर सर्व अभियानांची शंभर टक्के यशस्वी अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवड राज्यात पुन्हा एकदा आदर्श निर्माण करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

— शत्रुघ्न (बापू) काटे, अध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button