Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘अन्न व औषध प्रशासन’च्या छाप्यात ८४ टन भेसळ अन्न पदार्थांचा साठा जप्त

मुंबई | अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोहिमेअंतर्गत २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गुळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रिम/कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, शेंगदाणा चिक्की इ. अन्न पदार्थ तसेच भेसळ म्हणून वापरण्यात येणारे अन्न पदार्थाच्या सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये किंमतीचा ८४ हजार ३३५ किलो इतका साठा जप्त केला.

अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड व नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती सांभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली.

संशयित कमी दर्जा /असुरक्षित अन्नपदार्थ तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग यावर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर अन्नपदार्थाच्या प्रकरणी ४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तसेच अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

गुळामध्ये साखरेची भेसळ

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तीन ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले असून सदर तिन्ही ठिकाणी मिळून सुमारे १०,६६,२४२ रुपये किमतीचा गुळात भेसळ पदार्थ म्हणून वापरण्यात येणाऱ्या साखरेचा १५,०९६ किलो इतका साठा जप्त करण्यात आला.

आंबे पिकविण्यासाठी घातक पदार्थांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई

नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट मध्ये कृत्रीमरित्या आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे व संशयीत द्रवाचा वापर करताना आढळून आल्याने तीन ठिकाणी मिळून सुमारे ११ लाख १२ हजार ८५० रुपये किंमतीचे आंबे जप्त करण्यात आले.

हेही वाचा

खासदार बारणे यांच्याहस्ते संभाजी भेगडे यांचा सत्कार!

‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई’

अत्र सुरक्षा व मानके कायद्याखाली गुन्हे करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १२९ अंतर्गत गुन्हा दाखल करून गुटखा विक्री, अन्नात भेसळ करून गुन्हा केल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापना वर दंडात्मक व फौजदारी कारवाईसुद्धा करण्यात येईल. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल. असा इशारा अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन : अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा भेसळीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक तक्रारीत नमूद भेसळ होणाऱ्या ठिकाणाचा वा आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची विशिष्ट माहिती तक्रारीत नमूद करावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांना केले आहे.

अन्न व औषधाच्या दर्जाबाबतची तक्रार करण्याकामी प्रशासनाकडून नवीन अॅप विकसित करण्यात येणार असून नागरिकांना त्यावर तक्रार करणे सोपे होणार आहे तसेच नागरिकांना तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकही देण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या “सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र” या संकल्पनेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यात भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button