शेतकरी कर्जमाफीचा मुहूर्त ठरला! पुढच्या १० दिवसांत कर्जमाफ होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

अहिल्यानगर | राज्य शासनाने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी ८ ते १० दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी थेट आणि अधिकृत घोषणा राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (३१ मे) केली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना कर्जमाफीची अंमलबजावणी रखडल्याने चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाला या घोषणेमुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर केली. कृषीमंत्री म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या ८ ते १० दिवसांतच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रीतसर परवानगी घेऊनच मी ही मोठी घोषणा आज करत आहे.”
हेही वाचा
IPL 2026 Prize Money : आयपीएल जिंकणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार? जाणून घ्या..
आपल्या भाषणात पुढे बोलताना कृषीमंत्री भरणे म्हणाले, “मी राज्याचा कृषीमंत्री आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शब्द देणे माझे कर्तव्य आहे. भविष्यात शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. महायुतीचे सरकार खंबीरपणे जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केवळ जनतेच्या कल्याणासाठीच अहोरात्र काम करत आहेत.”
कृषीमंत्र्यांच्या या धडाकेबाज घोषणेमुळे पुढील आठवड्याभरात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’च्या अंमलबजावणीला गती मिळणार असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यांवरील २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





