मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा; जेसीबीमुळे पाणी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया
संबंधित ठेकेदारावर कारवाई करा : नगरसेविका अर्चना करांडे

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भक्ती शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण–मुंबई-पुणे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी मशीनद्वारे खोदकाम करत असताना मंगळवारी (दि. २७) रात्री पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेत हजारो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद ठेवावा लागला. परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेचा फटका निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर आदी भागांतील नागरिकांना बसला. अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्याने घरगुती वापरासह व्यापारी व दैनंदिन कामांवर परिणाम झाला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचा
दरम्यान, भाजपा नगरसेविका अर्चना करांडे आणि सामाजिक कार्यकर्ते अक्षय करांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे संबंधित मेट्रो रेल्वे ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनीही मेट्रो प्रकल्पाच्या कामांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, पाणी व इतर नागरी सुविधा अबाधित राहतील याची जबाबदारी ठेकेदारांवर निश्चित करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे मेट्रो कामांच्या नियोजन व अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान वारंवार पाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.
– अर्चना अक्षय करांडे, नगरसेविका, पिं. चिं. मनपा.





