‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत; RCC चे प्रमुख शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात!

लातूर | देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) आता आपला मोर्चा लातूरकडे वळवला आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) शिकवणी वर्गाचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. रविवारी दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेली ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती, त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अद्याप त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही.
दोन दिवसांपूर्वीच सीबीआयच्या पथकाने मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयावर छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. या कारवाईमुळे लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर, आरसीसी शिकवणी वर्गाच्या नोट्स किंवा सराव पेपरमधील तब्बल ४२ प्रश्न मुख्य ‘नीट’ परीक्षेत जसेच्या तसे आल्याची धक्कादायक तक्रार एका पालकाने केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर सीबीआयचे पथक थेट लातूरमध्ये दाखल झाले.
हेही वाचा
एम एस धोनी आज अखेरचा सामना खेळणार? CSK vs SRH सामन्यानंतर मोठ्या घोषणेची शक्यता!
विशेष म्हणजे, या प्रकरणात पुण्यातून अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा लातूरचाच रहिवासी असून तो रसायनशास्त्राचा (Chemistry) प्राध्यापक आहे. शिवराज मोटेगावकर हे देखील रसायनशास्त्रच शिकवतात. त्यामुळे आरोपी प्रा. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे आपापसात काय संबंध आहेत आणि या रॅकेटमध्ये त्यांची काय भूमिका होती, याचा शोध आता सीबीआयचे अधिकारी घेत आहेत. शनिवारपर्यंत मोटेगावकर आपण फक्त प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा दावा करत होते, मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
‘लातूर पॅटर्न’च्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NEET) उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँड लावून कौतुक करण्यापासून ते ‘लातूर पॅटर्न’चे फॅक्टरीमध्ये रूपांतर करण्याची जाहिरातबाजी करण्यासाठी मोटेगावकर प्रसिद्ध आहेत. मात्र, आता त्यांनाच सीबीआयने ताब्यात घेतल्यामुळे ‘लातूर पॅटर्न’च्या विश्वासार्हतेवर आणि गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या लातूरमध्ये सुमारे ३० ते ३२ मोठे शिकवणी वर्ग सुरू असून, तेथे विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क वसूल केले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या शिकवणी वर्गांमध्ये आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शिक्षक अध्यापनाचे काम करत असून, या पेपरफुटीचे कनेक्शन थेट इतर राज्यांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीबीआयच्या या धडक कारवाईमुळे लातूरमधील इतर बड्या शिकवणी चालकांचेही धाबे दणाणले आहेत.





