महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather | राज्यात सध्या हवामानाचे दोन वेगळे रंग पाहायला मिळत आहेत. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हामुळे नागरिक होरपळून निघत असून उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती आहे, तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पावसाचा हा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला असून शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
सध्या संपूर्ण देशात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना कडक उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.
हेही वाचा
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ३ रुपयांची मोठी दरवाढ
शुक्रवारी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग तसेच बीड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसासाठी अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अंदमान समुद्र, तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर येत्या १६ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अंदमानातील या आगमनानंतर मान्सूनच्या पुढील प्रवासात कोणताही अडथळा आला नाही, तर यंदा महाराष्ट्रातही नियोजित वेळेच्या आधीच मान्सून धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




