पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद : महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सायकलवरून महापालिका भवनात!
विरोधी पक्षाचे नगरसेवक राजू बनसोडे, स्वाती काटे बैलगाडीतून; मनसेचीही निदर्शने

पिंपरी-चिंवचड । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या (जीबी) पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. १५) महापालिका परिसरात नाट्यमय घडामोडी घडल्या. इंधन दरवाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा निषेध तसेच ५२ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे आणि प्रतिक्षा लांघी-जवळकर हे महापालिकेत थेट बैलगाडीवरून दाखल झाले. वाढत्या पेट्रोल-डिझेल दराविरोधात त्यांनी हे अनोखे आंदोलन करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. “इंधन दर इतके वाढले आहेत की आता सामान्य नागरिकांना वाहन वापरणे कठीण झाले असून बैलगाडीची वेळ आली आहे,” असा टोला आंदोलनकर्त्यांनी लगावला. बैलगाडीच्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा
YCM : ‘वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार!
दरम्यान, महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायकलवरून महापालिकेत आगमन केले. पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे सांगण्यात आले. महापौर आणि आयुक्तांच्या सायकल रॅलीचीही परिसरात चर्चा रंगली.

दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेतील कथित ५२ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. चुकीच्या पद्धतीने उपसूचनेवर सही करणाऱ्या नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. “महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार होत असून त्याची चौकशी झाली पाहिजे,” असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला. एकाच दिवशी बैलगाडी आंदोलन, सायकलवरून आगमन आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील वातावरण तापल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले.





