पानसरेंविरुद्ध ‘मरणोत्तर गुन्हा’ दाखल करा, प्रकाशकाला अटक करा; संजय गायकवाड यांची मागणी

बुलढाणा | ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरीनंतर शांत होईल, असे वाटत असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी याप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत, दिवंगत लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सोमवारी (२७ एप्रिल) त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले.
आमदार गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर मागण्या केल्या आहेत. सुमारे ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकासाठी परदेशातून काही आर्थिक मदत मिळाली आहे का? याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याचा आणि लेखकाच्या मृत्यूनंतरही पुस्तक छपाई सुरू ठेवल्याचा ठपका ठेवत, त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा
उन्हाळा वाढतोय…उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. मात्र, काही लेखक आणि प्रकाशक त्यांच्या नावाचा वापर करून केवळ आर्थिक फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाद्वारे जाणीवपूर्वक महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे समर्थन
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आणि अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये विजय अंभोरे, संदीप गायकवाड, धनंजय बारोटे, संजय हाडे, विजयसिंह राजपूत, जिजा राठोड, अनुजा सावळे, आशिष जाधव आणि श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कोल्हापूर येथे यापूर्वीच याप्रकरणी एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, आता बुलढाण्यातून झालेल्या या नवीन मागणीमुळे हा राजकीय आणि सामाजिक वाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





