महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कोकणात वादळी पावसाचा तडाखा, तर विदर्भात पारा ४४ अंशांच्या पार

Maharashtra Weather : महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला कोकणात अवकाळी पावसाचा जोर असून दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेने अक्षरशः हैराण केले आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकणातील महाड येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाली असून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड आणि लांजा तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आजही किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा – ‘भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथे तापमान 43 अंशांवर पोहोचले आहे. उष्णतेमुळे रस्ते ओस पडले असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. तसेच विदर्भातील अमरावती आणि अकोला येथेही तापमान 44 अंशांच्या पुढे गेले असून हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात असेच अस्थिर हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकणात अधूनमधून पाऊस, तर उर्वरित भागात उष्णतेची लाट कायम राहू शकते.
नागरिकांसाठी सूचना
-दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळा
-भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा
-हलके, सैल कपडे वापरा
-डोक्यावर टोपी किंवा कापड वापरा
-लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
या लहरी हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





