क्षमता, आत्मविश्वास ही यशस्वी फार्मासिस्टची गुरुकिल्ली : डॉ. वेदप्रकाश मिश्रा
शिक्षण विश्व : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये निरोप समारंभ

पिंपरी-चिंचवड | आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षातील पदविका (डी. फार्मसी), पदवी (बी. फार्मसी) तसेच पदव्युत्तर (एम.फार्मसी) व डॉक्टर ऑफ फार्मसी (फॉर्म. डी) या चारही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा विश्व विद्यापीठ, कराड येथील माननीय कुलगुरूंचे मुख्य सल्लागार तथा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, नागपूर येथील उपकुलपती व मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी यशस्वी जीवनासाठी क्षमता,आत्मविश्वास, काळजी आणि अनुकंपा हे चार घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कमी ध्येय आणि कमी महत्त्वाकांक्षा ठेवणे हा एक प्रकारचा अपराधच आहे, असे सांगून प्रत्येकाने मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास बाळगावा, असे त्यांनी आवाहन केले. भारत हा तरुण आणि तेजस्वी देश असून २१ व्या शतकावर भारताचा पगडा असणार आहे असे नमूद करून “मी करू शकतो” हा विश्वास प्रत्येकाने स्वतःमध्ये निर्माण केला पाहिजे व त्यासाठी वरील चार घटकांचा अवलंब करणे अतिशय आवश्यक आहे असे सांगितले.
हेही वाचा
जिजामाता रुग्णालयातील आरोग्य सेवांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला सविस्तर आढावा
संस्थेचे संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी आपल्या भाषणात सांगितले की रुग्णसेवेची कला आणि नैतिक मूल्ये ही फार्मासिस्टसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. “स्वतःपेक्षा सेवा प्रथम” हा दृष्टिकोन स्वीकारण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फॉर्म डी चा विद्यार्थी श्रीकांत नाईक यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम समन्वयक डॉ. सारिका निकम यांनी विशेष परिश्रम घेतले आणि प्रा. काजल भगत व प्रा. धनश्री गरुड यांनी विशेष सहाय्य केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार…
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की अभ्यासक्रमातील तसेच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थी उपक्रम एक सक्षम फार्मासिस्ट घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच, यश मिळवण्यासाठी भक्कम ज्ञान आणि प्रभावी संवाद कौशल्ये अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समारंभात डी. फार्मसी मधून राधिका चौधरी, बी. फार्मसी मधून ललित निमेकर, तर एम. फार्मसी मधून श्रद्धा भामरे आणि डॉक्टर ऑफ फार्मसी मधून संकेत पालवे यांना “सर्वोत्कृष्ट अंतिम वर्ष विद्यार्थी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शैक्षणिक आणि संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाविद्यालयाकडून दिला जाणारा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” प्रा. मुकेश मोहिते यांना प्रदान करण्यात आला. तसेच जी-पॅट या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.





