ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आता आरोग्य व वैद्यकीय समिती

भाजपा नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या मागणीला मोठे यश

शहर सुधारणा समितीच्या ठरावाला सर्वसाधारण सभेच्या मान्यतेची प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील शहर सुधारणा समितीने शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक वाढत्या समस्या लक्षात घेऊन नव्याने “आरोग्य व वैद्यकीय समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मांडला आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रशासकीय रचनेत आरोग्य क्षेत्राला स्वतंत्र आणि अधिक प्रभावी व्यासपीठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विषयावर भाजपा नगरसेवक आणि प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.सुहास कांबळे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका तथा शहर सुधारणा समितीच्या सदस्या डॉ. वैशाली घोडेकर यांनी संयुक्त प्रस्ताव सादर केला असून, शहरातील आरोग्य सेवा अधिक गतिमान, परिणामकारक आणि नागरिककेंद्रित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

सध्या महानगरपालिकेमध्ये पाच विषय समित्या कार्यरत आहेत. मात्र, शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्या अधिक गुंतागुंतीच्या होत असल्याने स्वतंत्र आरोग्य समितीची गरज भासत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. शहर सुधारणा समितीच्या ठराव क्र. ३, दिनांक १०/०३/२०२६ नुसार या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली असून, त्यास अनुकूल शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा        :                पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस १ कोटी अनुदान देण्याची शिफारस 

महापालिका आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद…

दरम्यान, या मुद्द्यावर महापालिका सर्वसाधारण सभेतही डॉ. सुहास कांबळे यांनी विशेष लक्ष वेधले होते. तसेच, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या समितीच्या आवश्यकतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबई महापालिका अधिनयमानुसार, वैद्यकीय व आरोग्य समिती स्थापन करण्याबाबत चाचपणी करावी. समितीची रचना, उद्देश आणि सदस्य संख्या याबाबत अहवाल तयार करावा, अशी सूचना केली आहे. आता समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आहे. त्याला मान्यता मिळाल्यास समितीच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

४० लाख नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णायक पाऊल

पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही समिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या, साथीचे आजार, तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवांची गरज लक्षात घेता स्वतंत्र समितीमुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नवीन आरोग्य व वैद्यकीय समिती स्थापन झाल्यास पुढील फायदे अपेक्षित आहेत— शहरातील आरोग्यसेवांमध्ये जलद निर्णय प्रक्रिया, रुग्णालये व आरोग्य केंद्रांचे प्रभावी नियोजन, साथीच्या आजारांवर तातडीने नियंत्रणख नागरिकांना अधिक सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा असा फायदा होणार आहे. शहराच्या वाढत्या आरोग्य गरजा लक्षात घेता स्वतंत्र समितीची स्थापना हा एक दूरदृष्टीचा आणि महत्त्वपूर्ण निर्णय ठरू शकतो. आता हा प्रस्ताव महापालिका सभेच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून, त्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र आरोग्य व वैद्यकीय समिती स्थापन होणे ही काळाची गरज आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला असून, आता त्याला यश मिळताना दिसत आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि परिणामकारक होतील, असा विश्वास आहे.

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button