धरणांतील पाणीसाठ्याबाबत जलसंपदा मंत्र्यांचे मोठे विधान

मुंबई : राज्यातील धरणांमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत मिळून ४७.७२ टक्के म्हणजेच २७३०९.९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ५४.३० टक्के, तर पुणे विभागात सर्वात कमी ४२.४२ टक्के पाणीसाठा आहे.
गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. नोव्हेंबरपर्यंत कमी – अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे बहुतेक सर्व धरण प्रकल्प पूर्णपणे भरले होते. त्यामुळे आजअखेर पाण्याची उपलब्धता चांगली राहिली आहे. गतवर्षा याच दिवशी राज्यात ४१.३३ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षाच्या तुलनेत पाच टक्के जास्त पाणी धरणांमध्ये शिल्लक आहे.
नागपूर विभागातील ३८७ धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा ४८.५६ टक्के (३२००.१५ दलघमी) पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील २७६ धरणांमध्ये ५४.३० टक्के (३०२६,९३ दलघमी) पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२९ धरणांमध्ये ५२.९६ टक्के (५७५५.५९ दलघमी) पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील ५३९ धरण प्रकल्पांत ४९.२२ टक्के (३७४०.३२ दलघमी) पाणीसाठा आहे. पुणे विभागातील ७२४ धरणांत ४२.४२ टक्के (९६१७.६७ दलघमी) आणि कोकण विभागातील १७३ धरणांत ४८.७७ टक्के (१९६९.२४ दलघमी) पाणीसाठा आहे. राज्यातील एकूण ३०२८ धरणांमध्ये ४७.७२ टक्के (२७३०९.९१ दलघमी) पाणीसाठा आहे.
हेही वाचा – ‘जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही’; पालकमंत्री डॉ. उदय सामंत
राज्यात मोठे, मध्यम आणि लहान, असे एकूण ३०२८ धरण प्रकल्प आहेत. गतवर्षापेक्षा पाच टक्के जास्त पाणीसाठी धरणांत आहे. पण, एल निनोमुळे यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गत चार वर्षांपासून जून अखेरपासून राज्यात पाऊस सुरू होतो आणि जुलै अखेरपर्यंत चांगला पाऊस होतो. त्यामुळे राज्यातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनही जुलै अखेरपर्यंत करावे लागणार आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिकरणासाठीच्या पाणी वापरात सुवर्णमध्य साधावा लागणार आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांसाठी पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.
भारतीय हवामान विभागाने एल निनोमुळे यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जलसाठा मुबलक असला तरीही जलसंपदा विभागाने ऑगस्टअखेर पाण्याचे नियोजन केले आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा अपव्यय टाळून काटकसरीने, नियोजनपूर्वक वापर करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.
विभागनिहाय जलाशयांमधील जलसाठा
नागपूर : ४८.५६ टक्के
अमरावती : ५४.३० टक्के
छत्रपती संभाजीनगर : ५२.९६ टक्के
नाशिक : ४९.२२ टक्के
पुणे : ४२.४२ टक्के
कोकण : ४८.७७ टक्के
मोठ्या धरणांतील पाणीसाठा
गोसीखुर्द – ५७.८२ टक्के
जायकवाडी – ५७.२६ टक्के
भांडरदरा – ५३.१४ टक्के
कोयना – ३९.३६ टक्के
उजनी – ३२.०५ टक्के
भातसा – ४९.१६ टक्के
मध्य वैतरणा – ३६.८० टक्के





