PCMC: महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवणार सभापती अभिषेक बारणे ‘‘संकटमोचक’’
विक्रमी कर वसुली करण्यात प्रशासनाला यश : महापालिकेतील विविध विभागांच्या प्रमुखांचा केला गौरव
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी ।
‘‘पिंपरी-चिंचवड महापालिका आर्थिक संकटात आहे…’’ असा सर्वस्तरातून सूर असताना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची आर्थिक घडी बसवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. महापालिका प्रशासनाच्या विविध विभागांकडून गत आर्थिक वर्षात विक्रमी कर वसुली झाली. चालू आर्थिक वर्षात खर्च आणि उत्पन्न याचा समतोल राखत काटेकोर नियोजन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी बारणे ‘‘संकटमोचक’’ च्या भूमिकेत काम करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून विविध विभागांनी विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल स्थायी समिती सभेत विभागप्रमुखांचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
महापालिकेच्या वाढीव उत्पन्नामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीत मोठी बळकटी आली असून शहराच्या विकासाचे चक्र अधिक वेगाने धावणार आहे, असा विश्वास सभापती अभिषेक बारणे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशासन आणि अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देण्याची भूमिका बारणे यांनी घेतली.
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिकेचे आर्थिक गणित कोलमडले होते. महापालिका निवडणूक झाली. त्यानंतर प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. त्यावेळी सभापती बारणे यांनी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या अर्थसंकल्पातील त्रूटी दूर करण्यासाठी वेळ घेतला. त्यानंतर सुमारे १२०० उपसूचनांचा स्वीकार करुन सुमारे ४०० कोटी रुपयांचा फुगवटा असलेला अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला. सर्वसाधारण सभेमध्ये बारणे यांनी अर्थसंकल्पाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले. सोबतच महापालिकेसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर लक्ष वेधले. त्याचे सर्वपक्षीय सदस्यांनी स्वागतही केले होते.
अधिकाऱ्यांवर कौतूकाची थाप…
महानगरपालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाने यंदा सर्वाधिक ९६१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यापाठोपाठ बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ६७६ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागाने ८० कोटी ७४ लाख रुपये, आकाशचिन्ह व परवाना विभागाने २१ कोटी ५० लाख रुपये आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने १ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. या प्रभावी कामगिरीबद्दल सभापतींनी सहशहर अभियंता सुनील बागवानी, उप आयुक्त सचिन पवार, राजेश आगळे, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास आणि मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांचे विशेष अभिनंदन केले व महसूल वाढीची ही कामगिरी कायम राखण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकारी आणि प्रशासनावर गलथानपणाचे आरोप झाले. अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत, अशी टीका करण्यात आली. मात्र, चुकीच्या गोष्टींना विरोध करतानाच, महापालिकेच्या वाढीव उत्पन्नाबाबत स्थायी समिती सभापतींनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कौतूकाची थापसुद्धा दिली. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळातही सकारात्मक संदेश गेला आहे.
प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. हे वाढीव उत्पन्न शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आज मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना याचा मोठा लाभ मिळेल.– अभिषेक बारणे,सभापती, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका.





