महाराष्ट्रासह देशभर गॅस तुटवडा; सरकार वास्तव का लपवतंय? सुप्रिया सुळे सवाल

Supriya Sule | महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मान्य का करत नाही? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसंच ही वेळ कुठलंही राजकारण करण्याची किंवा आरोप करण्याची नाही. यावर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे आणि जनतेला जे वास्तव आहे ते सांगितलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी शनिवार आणि रविवारी पुण्यात होते. बारामती लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला. प्रचंड अडचणी सगळीकडे दिसत आहेत. सरकार वास्तव मान्य का करत नाही? देशपांडे म्हणून एक ग्रुप आहे ते धायरीत पोळ्या करतात. हिंजवडीतल्या काही कंपन्या आहेत, त्यांना पोळ्या पाठवत असतात. तिथे ५० टक्के काम बंद झालं आहे. कारण गॅसचा तुटवडा आहे. तशीच परिस्थिती बारामतीत आहे. बारामतीत सगळे व्यवसाय करणारे आहेत त्यावेळी अनेकांनी माझी भेट घेतली. व्यावसायिक गॅस मिळत नाही. रेस्तराँ बंद झाले आहेत, लघुउद्योग बंद झाले आहेत. दौंड, इंदापूर या भागांमध्ये गॅस तुटवड्यामुळे ७५ टक्के कामगार कमी केले आहेत. सरकार देशात गॅसचा तुटवडा भासतोय हे मान्य का करत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; १० ग्रॅमच्या भावात मोठा बदल, पाहा आजचे दर
लघू उद्योग, खानावळी, महिला भगिनी ज्या घरातून काही व्यवसाय करतात तिथे अडचणी येत आहेत. रांगा लावून पुरुषांना किंवा महिलांना गॅस आणावा लागतो आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी गॅस सिलिंडर संदर्भात जी एक मोठी जाहीरात केली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की डोळ्यांतून अश्रू आणि खोकला येता कामा नये कारण चूल नको. आपण लोकांनी सबसिडी सोडून दिल्या. आज त्याच कष्टकरी महिलांना सिलिंडर मिळत नाही. अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. कारण हा विषय राजकीय विषय राहिलेला नाही. देशातल्या लोकांना वास्तव काय ते सांगितलं पाहिजे. कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागू शकतो. राहुल गांधी यांनी तुटवड्याबाबत जे मुद्दे मांडले ते आता दोन आठवड्यांनी खरं होताना दिसतं आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
गॅसचा तुटवडा आहे हे भारत सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का लपवत आहेत? मला ते समजतच नाही. तुटवडा आहे तर कृती आराखडा का आखला जात नाही? जिल्हाधिकारीही तेच बोलत आहेत जे सांगितलं गेलं आहे. भारतात एलपीजीची सगळी यंत्रणा कोसळली आहे. त्यामुळे संसदेत आम्ही या विषयावर चर्चा मागतो आहे. आत्ताची वेळ ही कुठलाही विरोध करण्याची नाही ही या समस्येतून मार्ग काढण्याची वेळ आहे. महाराष्ट्रात आणि भारतात काय चाललंय? मारामाऱ्या होत आहेत. मी कुणावर आरोपच करत नाहीये. माध्यमांनी दाखवलेल्या बातम्या बघा तुटवडा आहे तेच तो दाखवत आहेत. भारतातले लोक अडचणीत आहेत, गृहिणी अडचणींत आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी जर सगळी चॅनल्स पाहिली तर कुठे तुटवडा आहे ते त्यांनाही समजेल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बारामती, जळगाव, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई सगळीकडे तुटवड्याची स्थिती आहे. महाराष्ट्र आणि भारत सरकार कशाची वाट बघतं आहे? का सांगत नाही की देशात तुटवडा आहे? सरकार जे सांगतं आहे आणि जे वास्तव आहे त्यात सामान्य माणूस भरडला जातो आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.





