ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळे येथील वाहतूक कोंडी-धुळीच्या समस्येची महापौरांकडून पाहणी!

सोसायटीधारक- नागरिकांना रोजचा मन:स्ताप : प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड | पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुनावळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच परिसरातील वाढती धुळीची समस्या लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी चौकातील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडीची कारणे तसेच परिसरातील धुळीची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

पुनावळे परिसरात गेल्या काही वर्षांत वेगाने नागरीकरण वाढले असून पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या या चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. त्यामुळे सकाळ व सायंकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याची बाब पाहणीतून निदर्शनास आली. तसेच चौक परिसरात सुरू असलेली विविध कामे, वाहनांची मोठी वर्दळ आणि रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

हेही वाचा       :              महाराष्ट्रासह देशभर गॅस तुटवडा; सरकार वास्तव का लपवतंय? सुप्रिया सुळे सवाल

या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन चौकातील धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी करणे, रस्त्यांची स्वच्छता राखणे तसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिग्नल व्यवस्थेचे योग्य नियोजन, वाहतुकीचे सुयोग्य मार्गदर्शन आणि पर्यायी मार्गांचा वापर याबाबतही नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

समस्येवर उपाययोजनांसाठी संयुक्त बैठक…

याशिवाय या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात लवकरच संयुक्त बैठक घेऊन योग्य उपाययोजना निश्चित करण्यात येतील, असेही महापौर लांडगे यांनी यावेळी सांगितले. या पाहणीवेळी नगरसदस्या रेश्मा भुजबळ, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, महापालिकेचे सह शहर अभियंता सुनिल भागवानी, कार्यकारी अभियंता सोहन निकम व योगेश आल्हाट, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, शांताराम माने तसेच नामदेवराव जाधव, चेतन भुजबळ, गजानन सूर्यवंशी, गणेश पायाळ आदी उपस्थित होते. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button