रायगड किल्ल्याबाबत महत्वाचे अपडेट,संभाजीराजे छत्रपती यांनी केली घोषणा…स्वराज्याच्या राजधानीचा पट आगळ्यावेगळ्या पध्दतीने उलगडणार….

अलिबाग : रायगड किल्ल्याचा इतिहास आता लाईट अँड साऊंड शेवटच्या माध्यमातून उलगडणार आहे. बहुप्रतिक्षित असा लाईट अँड साऊंड शो येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावर सुरू होणार आहे, हा देशातील पहिला ३६० अंशांचा लाईट अँड साऊंड शो ठरणार आहे. अशी माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. या प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.
गडावर ३६० अंशांतील स्पॉट लाईट आणि साऊंण्डच्या माध्यमातून किल्ले रायगडाचा गौरवशाली इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. सुमारे ४५ मिनिटांच्या या शोमध्ये बाजारपेठ, होळीचा माळ, नगारखाना, राजसदर, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी स्थळासह गडावरील इतर शिवकालीन वास्तू प्रकाशयोजनांच्या माध्यमातून जिवंत केल्या जाणार आहेत. या शोमुळे पर्यटकांना रायगडाचा इतिहास अधिक प्रभावी आणि जिवंत स्वरूपात अनुभवता येणार आहे.
मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये हा शो किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना पाहता येणार आहे. आठवड्यातून चार दिवस मराठीत, एक दिवस हिंदीत तर एक दिवस इंग्रजी मध्ये हा शो करण्याचा प्रयत्न असणार आहे. सूर्यास्तानंतर ठराविक वेळेत या लाईट अँड साऊंड शो चे आयोजन केले जाईल. जेणेकरून पर्यटकांना रोपवे मार्गाने गडाखाली उत्तरता येईल. एकावेळी चारशे ते पाचशे पर्यटकांना हा अनुभव घेता येणार आहे.
हेही वाचा – विदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य ठरणार धोक्याचे
राज्ससरकारने किल्ले रायगडाच्या जतन आणि संवर्धनासाठी सहाशे कोटी रुपयांचा आराखड्याला मंजूरी दिली आहे. या अंतर्गत गडावर तसेच पाचाड परिसरात रायगड किल्ला जतन आणि संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गडावरील कामे हे पुरातत्व विभागाच्या मार्फत केली जात असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महाड ते पाचाड मार्गाचे काम सध्या सुरू आहे. पाचाड येथे भव्य शिवसृष्टी उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांवर सोशल मीडियावरून टीका होत आहे. सोशल मीडियावरील रिलच्या माध्यमातून लौकिक गोळे या तरुणाने गडावरील पायऱ्या आणि भिंतींचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे. बांधकामातून सहज निखळणारे दगड आणि दगडांच्या जॉईंटमध्ये भरलेली माती दाखवत या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
या टीकेला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावरील रिलच्या माध्यमातून टीका करण्याऐवजी, कामाबाबत काही तक्रार असल्यास ती थेट रायगड प्राधिकरणाकडे करावी, असे स्पष्ट केले आहे. प्राधिकरणामार्फत सुरू असलेली जतन आणि संवर्धनाची कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व नियमानुसार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.





