‘मविआ’च्या मतांच्या विभाजनाचा महापालिकेतही फटका बसेल? अंबादास दानवे म्हणाले..

Ambadas Danve | राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, महाविकास आघाडीत मुंबईत मतभेद उघड झाल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आज जाहीर होत असलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीतील घटक पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन महापालिका निवडणुकीतही झाले तर त्याचा फटका बसेल का, असा सवाल शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. नगरपालिकांचे राजकीय गणित वेगळे असते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : ‘एकदम ओक्के!’ सर्वांनी एकटं पाडलं, पण शहाजीबापूंनी सांगोल्याचे मैदान मारलं
अंबादास दानवे म्हणाले की, महापालिकेची आणि नगरपालिकेची गणिते वेगवेगळी आहेत. खूप ठिकाणी नगरपालिकेची मतदार संख्या महानगरपालिकेच्या एका वॉर्डापेक्षा कमी आहे. महानगरपालिकेच्या एका प्रभागाचे मतदार आणि अख्ख्या नगरपालिकेचे मतदान या प्रभागापेक्षा कमी आहे. मुंबई ५० हजार-६० हजरांचा प्रभाग आहे, नगरपालिका १५ हजार, २० हजार, २५ हजार याच्या वरती मतदान नाही. एखादी नगरपालिका ५० हजारांची आहे. साधारणपणे २५ ते ३० हजार सरासरी मतदान सगळ्या नगरपालिकांमध्ये असतं, त्यामुळे त्याचं राजकीय गणित महानगरपालिकेला लागू होत नाही.
काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे की त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर निवडणूक लढवली तर अल्पसंख्यांक समुदायाची काँग्रेसच्या हक्काची मती शिवसेनेला मिळतील. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, कोणत्याही जाती-समाजाची मते ही कोणाचीही मालकी नसते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सगळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेते. हिंदूत्वाची भूमिका तर आहेत, पण ख्रिश्चन, शीख, बौद्ध, मुस्लिम बांधवांनी देखील शिवसेनेला मतदान केले आहे.





